मुंबई : बोरिवलीतील बाभई राम मंदिर मार्गावरील एक सोसायटी सध्या एका पाळीव कोंबड्यामुळे चर्चेत आहे. या कोंबड्याचे नाव 'रॉबर्ट' असून त्याची शिस्तप्रिय दिनचर्या आणि घरच्या सोबतच्या मौजमस्तीचे कौतुक होत आहे. नुकताच त्याचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला असून, रॉबर्ट या परिसरामध्ये सर्वांसाठी चर्चेचा विषय झाला आहे. (rooster Robert from Borivali) (special story about rooster Robert).
रॉबर्ट, सबनीस कुटुंबाचा सदस्य : कोंबडा सहसा कोणी घरामध्ये पाळत नाही. मुंबईसारख्या शहरांमध्ये फ्लॅट संस्कृतीमध्ये हा पाळायला अनुमतीही दिली जात नाही. परंतु बोरिवलीतील रहिवासी असलेले शिरीष सबनीस यांनी मुलगी जान्हवीच्या हट्टामुळे त्यांनी एक दिवसाचे कोंबडीचे पिल्लू पावणे तीन वर्षांपूर्वी ते मालवण येथील बाजारातून खरेदी करून घरी आणले. ते पिल्लू आज दोन वर्ष नऊ महिन्यांचे झाले आहे. सबनीस यांनी मालवण येथून हे पिल्लू बोरवलीच्या फ्लॅटमध्ये आणले तेव्हा सोसायटीतील सदस्य काय बोलतील, याचा विचार त्यांच्याही डोक्यात आला होता. पण मुलगी जान्हवी ते पिल्लू पाळण्यावर ठाम असल्याकारणाने तिच्या हट्टापायी त्या सफेद रंगाच्या पिल्लाचे नाव 'रॉबर्ट' ठेवले. आज ते पिल्लू या कुटुंबाचा एक सदस्य झाले असून रॉबर्ट नावाचा हा कोंबडा सर्वांचा लाडका झाला आहे.
![सबनीसांचा 'रॉबर्ट'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-robertspecialcock-7210570_01122022170444_0112f_1669894484_455.jpg)
वाढदिवस जोरात साजरा झाला : अतिशय लाडात वाढवलेल्या या रॉबर्टला आपल्या प्रमाणेच राग येतो. तो चिडतो आणि मस्तीही करतो. जान्हवीची आई सुजेता ह्या दिवसभर त्याची काळजी घेतात. त्यांना त्याच्या आवडीनिवडी आणि सवयी व्यवस्थित ठाऊक झाल्या आहेत. रॉबर्ट सकाळी आरवून सर्वांना जागे करतो. रविवारी सुट्टीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपणाऱ्यांच्या अंगावर चढून तो त्यांना चोच मारून उठवतो. तेव्हा त्याला भूक लागलेली असते. रॉबर्टच्या वाढदिवसानिमित्त जान्हवी ने घरात सजावट केली होती. फुले आणि फुगे लावले होते. रॉबर्टने ही केक वर चोच मारतात सर्वांनी टाळ्या वाजवून रॉबर्टला शुभेच्छा दिल्या. जान्हवीने लहान भावासारखा त्याचा वाढदिवस साजरा केला.
दिवाळीचा फराळ सुद्धा आवडीने खातो : रॉबर्टच्या सवयी विषयी बोलताना शिरीष सबनीस सांगतात की, आम्ही बाहेर जाण्याची तयारी सुरू केली तर तो विशिष्ट आवाज करून कपड्यावर चोच मारतो. त्यालाही बाहेर जायचे असते. खाण्याच्या वेळेत बदल झाला की तो मानेने तुरा हलवत स्वयंपाक घरात घुसून पत्नीला जोरजोरात आवाज देतो. जेवताना त्याला ताटातील थोडे अन्न बाजूला काढून द्यावे लागते. दिवाळीचा फराळ सुद्धा तो आवडीने खातो. कधी कधी त्यालाही बाजारात घेऊन जावे लागते. दर रविवारी रॉबर्टला आंघोळ घालण्याचं काम शिरीष सबनीस करतात. सोसायटीतील मुलेही रविवारी खास रॉबर्टला भेटण्यासाठी येतात, असेही सबनीस यांनी सांगितले आहे.