मुंबई Milind Deora Join Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतील आणखी एक मोहरा गळाला लावल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. काँग्रेसचे माजी मंत्री, तथा माजी खासदार मिलिंद देवरा लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून देवरा यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ते शिवसेनेच्या (शिंदे गट) वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.
कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू : या संदर्भात मिलिंद देवरा यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे जुने कार्यकर्ते, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी तसंच आमदार अमीन पटेल यांच्याशी संपर्क साधलाची माहिती मिळतेय. सध्या मिलिंद देवरा सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. कार्यकर्त्यांची फळी आपल्यासोबत येणार का, याची चाचपणी देवरा यांनी सुरू केली आहे.
'मी' कुठंही जाणार नाही : याबाबत आमदार अमीन पटेल यांनी सांगितलं की, एखाद्या व्यक्तीनं कोणताही निर्णय घेतला, तर त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागते. 'मी' काँग्रेसचा आमदार आहे, 'मी' काँग्रेसमध्येच असून कुठंही जाणार नाही’ अशा शब्दांत पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तर, देवरा यांचं स्वागत : दुसरीकडं मिलिंद देवरा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जोरदार संकेत मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेसाठी काम करणारे नेते आहेत. शिंदे सातत्यानं लोकांमध्ये काम करताय. दक्षिण मुंबई सारख्या विभागात जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून मिलिंद देवरा यांची साथ लाभली तर निश्चितच आम्हाला आनंद होईल. मिलिंद देवरा, आमच्या पक्षात येत असतील तर आम्ही त्यांचं निश्चितच स्वागत करू, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. त्यामुळं मिलिंद देवरा यांचा पक्ष प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. या संदर्भात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा -