मुंबई - गेली चार-साडेचार वर्षे सत्तेत एकत्र राहूनही विरोधकांहूनही अधिक त्वेषाने परस्परांवर टीका करणारे भाजप शिवसेनेनने दिलजमाईची घोषणा केली. सोमवारी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांनी याबद्दलची घोषणा केली. लोकसभेत शिवसेना २३ तर भाजप २५ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. मात्र, काही दिवसांआधी स्वबळाची भाषा बोलणारे आज तलवार म्यान करून युतीत सामिल झाले, यावरुन सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शिवसेनेची जाम खिल्ली उडवली.
#युतीरिटर्न्स, #शिवसेनेचायुटर्न, #युती, #स्बबळावर, #लाचार असे हॅशटॅग करत नेटकऱ्यांनी शिवसेना नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची खिल्ली उडवली. चित्रपटांच्या विविध सीनचा वापर करुन मीम्स बनवण्यात आले. यात शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली, राजीनामे खिशात घेऊन फिरणारे आता कुठे गेलेत, भाजपने मुका घेतला तरी त्यांच्यासोबत जाणार नाही म्हणणारे संजय राऊत आज काय गिळून बसले आहेत. पुन्हा युती नाही, अशी उद्धव ठाकरेंनी केलेली घोषणाही यावेळी त्यांना आठवणीत आणून देण्यात आली.
कार्यकर्त्यांची या युतीमुळे नेमकी काय परिस्थिती झाली असेल, याविषयीच्या मीम्सपासून युतीला विविध दृष्टीकोनातून मांडत हे ट्विट करण्यात आले आहेत. त्यामुळे ही राजकीय गणिते जनतेला मात्र काहीशी पटलेली नाही, हेच आता स्पष्ट होत आहे. आता युतीचा फायदा कोणाला होणार आणि शिवसेनेच्या वाट्याला नेमकं काय येणार हे येणारा काळच ठरवणार आहे.