मुंबई : मुंबईच्या बाजूलाच असलेल्या नवी मुंबई आणि तिसरी मुंबई म्हणून ओळख निमार्ण होत असलेल्या उरण विभागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. येथील नागरिकांच्या सुविधेसाठी उरण मार्गावर पाच तर ठाणे वाशी मार्गावर एक अशा एकूण सहा नवीन स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या सहाही स्टेशनचे लोकार्पण एकाच वेळी होणार आहे. यामुळे नवी मुंबई आणि उरण परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अलीकडेच दिघेसह स्थानकांतील सुविधा, नवी मुंबई उपनगरीय नेटवर्कवरील विविध स्थानकांतील स्वच्छता व दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेतला होता.
खारकोपर पर्यंतचा टप्पा पूर्ण : मुंबईमध्ये सध्या मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत खोपोली, हार्बर मार्गावर पनवेल पर्यंत तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी या मार्गावर लोकल ट्रेन चालवल्या जात आहेत. आता नव्याने बेलापूर सीवूड्स उरण २७ किलोमीटर लांबीचा रेल्वे प्रकल्प राबवला जात आहे. यामधील १२.४ किलोमीटरचा खारकोपर पर्यंतचा टप्पा पूर्ण झाला आहे. २०१८ मध्ये खारकोपर पर्यंत रेल्वे सेवा सुरु असून ४० लोकल ट्रेन चालवल्या जात आहेत.
नवीन पाच रेल्वे स्टेशन : बेलापूर ते उरण मार्गावर खारकोपर पासून पुढे गव्हाणपाडा, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही पाच नवीन स्टेशन उभारण्यात आली आहेत. १४.६० किलोमीटरच्या या मार्गावर रेल्वेची अंतिम सुरक्षा तपासणी सुरु आहे. या चाचणीनंतर या पाच स्टेशनचे लोकार्पण होऊन रेल्वे सेवा सुरु केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च २९०० कोटी रुपये इतका आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावर दिघे स्थानक : नवी मुंबई ट्रान्स हार्बर मार्गावर ऐरोली आणि कळवा दरम्यान दिघे हे स्थानक उभारण्यात आले आहे. ठाणे वाशी आणि ठाणे बेलापूर रोड मार्गवर हे स्थानक आहे. ट्रान्स हार्बर मार्गासह ठाणे आणि ऐरोली स्थानकाला यामुळे जोडले जाणार आहे. याच ठिकाणाहून नवीन उन्नत मार्ग सुरु होणार आहे. दिघे स्थानक हा उन्नत कॉरिडॉरचा एक भाग आहे
या प्रवाशांना फायदा : राज्य सरकारच्या सिडको म्हणजेच शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ आणि रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प पूर्ण केला जात आहे. यामधील एक तृतीयांश खर्च रेल्वे करत आहे तर इतर खर्च सिडकोकडून केला जात आहे. ही नावीन लाईन हार्बर मार्गाला नेरुळ आणि बेलापूर या दोन ठिकाणी जोडली जाणार आहे. यामुळे नवी मुंबईसह उरण पर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
रेल्वे स्थानकांची संख्या वाढणार : मुंबईमध्ये मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत खोपोली आणि हार्बर मार्गावर पनवेल पर्यंत ८० रेल्वे स्थानके आहेत. नव्या सहा स्थानकामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवरील स्थानकांची संख्या ८६ होणार आहे. पश्चिम रेल्वेवर ३७ स्थानके आहेत. नव्याने सहा स्टेशन कार्यरत झाल्यावर मुंबईमधील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या १२३ होणार आहे.
हेही वाचा : Old Pension Scheme : मोठी बातमी! सर्व यंत्रणा ठप्प होणार? मंगळवारपासून १८ लाख कर्मचारी बेमुदत संपावर