मुंबई - येथील सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही गेल्या 3 ते 4 महिन्यात निविदा काढण्यात आल्या नाहीत. आता पुन्हा नव्याने निविदा मागवण्याचा घाट प्रशासनाकडून घातला गेला आहे. यामुळे निविदा काढण्यासाठी आणखी 4 महिन्याच्या कालावधी लागणार आहे. यामुळे रुग्णालयाचा पुनर्विकास रखडण्याची भीती नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा आणि समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे.
सायन रुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे. यामुळे त्याठिकाणी 1 हजार 900 खाटांचे रुग्णालय, डॉक्टरांसाठी वसतिगृह, परिचारिका महाविद्यालय आणि निवासी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान उभारले जाणार आहेत. त्यासाठी पालिका 672.55 कोटी रुपये खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा खर्च जास्त असल्याने तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी कंत्राटचे दर कमी करण्यास सांगितले. कंत्राटदाराने रक्कम कमी करण्यास नकार दिला. कंत्राटदाराबरोबर वाटाघाटी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, आरोग्य संचालक आणि नगर अभियंता यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करून त्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने 14 वरून 10 टक्क्यात काम करण्याची तयारी दर्शवली. त्यावर प्रशासनाने आणखी कंत्राटमूल्य कमी करण्याची विनंती केली. कंत्राटदाराने आणखी 2 टक्के म्हणजे ८.९० टक्क्यांपेक्षा मूल्य कमी करण्यास नकार दिल्याने प्रशासनाने अखेर निविदाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - सारथीच्या सक्षमीकरण जीआरचे आबासाहेब पाटलांनी केलं स्वागत
स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून निविदा रद्द करून नव्याने निविदा मागवण्याची परवानगी मिळावी, यासाठी प्रशासनाकडून निवेदन करण्यात आले. याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जोरदार विरोध केला. यावेळी बोलताना सर्वात कमी बोली लावणाऱ्या अहलुवालिया कंपनीशी वाटाघाटी यशस्वी न झाल्याने निविदा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा आहे. 3 महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव मंजुर झाला आहे. पालिकेच्या अंदाजित रकमेत कंत्राटदार काम करत नसेल तर तातडीने नवीन निविदा का काढल्या नाहीत?, 3 महिने प्रशासन झोपा काढत होते का? असा सवाल त्यांनी केला आहे. प्रशासनाच्या वाटाघाटीच्या खेळात पुनर्विकास रखडणार आहे आणि रुग्णांचे हाल होणार आहेत, असे राजा यांनी स्पष्ट केले. सायन हॉस्पिटलमधील हृदय विकार शस्त्रक्रिया विभाग बंद करण्यात आला आहे. या रुग्णांना नायर रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. त्याठिकाणीही जागा कमी आहे. प्रशासनाकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार आणि समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली.
हेही वाचा - राज्यातील सरकार कायद्याने नाही, तर राजकीय वायद्याने काम करते; आशिष शेलारांची टीका
काय आहे नेमका प्रस्ताव?
सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय 1 हजार 900 खाटांचे केले जाणार आहे. या रुग्णालयाच्या आवारातच वैद्यकीय महाविद्यालय, 20 मजल्याची परिचारिका महाविद्यालय आणि निवासी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान इमारत, 19 मजल्याची कर्मचारी निवासस्थानाची इमारत, 25 मजल्यांची पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत, 3 मजल्यांची तात्पुरता निवारा इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी नवी दिल्लीतील अर्कोप आणि शशांक मेहेंदळे अॅण्ड असोसिएटसने आराखडे बनवले आहेत. यासाठी पालिका 672.55 कोटी रुपये खर्च करणार आहे.