मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेच्या निवडणूकीनिमित्त वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघात कॉंग्रेसमधून सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केली. यानंतर उद्धव ठाकरे गटाने अपक्ष उमेदवार शुंभागी यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. यावरून शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबेवर टीका करत राजा का बेटा राजा नही बनेगा, असे म्हणत त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.
ठाकरे गटाचा पाठिंबा? : नाशिकमध्ये कॉंग्रेसला धोबीपछाड मिळाल्यानंतर पुढील रणनीती आखण्यासाठी मातोश्रीवर आज शिवसेना नेत्यांची बैठक झाली. नाशिकच्या अपक्ष आमदार शुभांगी पाटील यावेळी उपस्थित होत्या. बैठक संपल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, पाठिंब्याबाबतची अधिकृत माहिती पक्षश्रेष्ठींकडून दिली जाईल. शिक्षक संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील शिक्षक बांधवांसाठी दहा वर्षे काम केले आहे. अन्नत्याग करून त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. गेली दहा वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच संधी देण्याची मी मागणी केली असल्याचे ते म्हणाले.
शुभांगी पाटील यांचा दावा : शुभांगी पाटील म्हणाल्या की, राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करतो, ज्याची पात्रता तो आमदार बनेल, असा घणाघात शुभांगी पाटील तांबेंवर केला. तसेच आज पक्षश्रेष्ठींसोबत माझे बोलणे झाले असून पाठिंब्याची मागणी केली आहे. त्यांचा जो काही निर्णय असेल तो त्यांचे प्रतिनिधी येऊन कळवणार आहे. महाविकास आघाडीने मला पाठिंबा तर मी पहिली पदवीधर महिला आमदार नाशिकमधून असेन, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी आक्रमक : राज्य विधान परिषदेच्या पाच जागांवर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा असा सामना रंगलेला असताना नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला असताना, पक्षाला अंधारात ठेवत मुलगा सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरला. परस्पर घेतलेल्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे.
शुभांगी पाटील यांचा परिचय : शुभांगी पाटील यांचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सारवे बुद्रुक हे मूळ गाव आहे. जळगाव जिल्ह्याचे माहेर, धुळे जिल्ह्याची सून, नंदुरबार जिल्ह्याचे आजोळ तर नाशिक जिल्ह्यातील वास्तव्य अशी पार्श्वभूमी असलेल्या शुभांगी पाटील या शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत एकमेव महिला उमेदवार आहेत. शुभांगी पाटील भास्कराचार्य संशोधन संस्था धुळे येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशन या संघटना त्यांनी स्थापन केल्या असून 2017 पासून पदवीधर मतदारांच्या समस्या आणि प्रश्नांसाठी त्या काम करीत आहेत. शुभांगी पाटील यांनी नुकताच सप्टेंबर 2022 मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला होता.
हेही वाचा: सत्यजीत तांबे बिनविरोध नाहीत पदवीधरसाठी ठाकरे गटाचा शुभांगी पाटलांना पाठिंबा