मुंबई- राज्यातील कृषी, सामाजिक, राजकीय आणि कोरोना महामारीच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा..
यवतमाळ जिल्ह्यात 54 कोरोनाबाधितांची भर
यवतमाळ : जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 54 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर 37 जणांनी कोरोनावर उपचार घेऊन मात करत रुग्णालयातून सुट्टी घेतली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 54 जणांमध्ये 40 पुरुष व 14 महिला आहेत.
यात पुसद शहरातील मोमीनपुरा येथील एक पुरुष आणि खातीब वॉर्ड येथील सर्वाधिक 13 पुरुष व पाच महिला पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात बुधवारपर्यंत 344 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण होते. यात आज 54 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 398 वर पोहोचला. मात्र, 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 37 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 361 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 953 झाली आहे. यापैकी 565 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 27 मृत्यूची नोंद आहे.
नंदुरबारमध्ये शिल्लक कापूस खरेदीला प्रारंभ
नंदुरबार - तालुक्यातील पळाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारच्या स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 25 वाहनांमधुन सुमारे 600 क्विंटल कापसाच्या खरेदीचा शुभारंभ आमदार डॉ. विजयकुमार गावीत व जि.प. उपाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी यांच्या हस्ते झाला.
नंदुरबार तालुक्यातील कापूस खरेदी पूर्ण झाल्याने शिरपूर तालुक्यातील शिल्लक 344 शेतकर्यांकडील कापूस खरेदी बाकी होती. सन 2019-20 च्या हंगामातील शिरपूर तालुक्यातील शिल्लक कापसाची खरेदी किमान आधारभूत दराने करण्यास पळाशी केंद्रात सुरुवात झाली आहे.
दिंडोरीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
दिंडोरी ( नाशिक )- दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय बाबुराव लभडे, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते ५१ वर्षांचे होते.
अल्पभूधारक शेतकरी दत्तात्रय लभडे यांच्यावर देना बँकेचे नऊ लाख रुपये कर्ज आणि चिंचखेड विविध कार्यकारी सोसायटीचे दोन लाख रुपये कर्ज होते. गेल्या चार वर्षांपासून शेतातील सततची नापिकी तसेच द्राक्ष बागेत कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी द्राक्षबागेवर काढून टाकली होती. त्यामुळे उत्पन्नाचे कोणतेही पर्याय खुले दिसत नसल्याने नैराश्यातून गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास लभडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी,दोन मुले, सून भाऊ,असा परिवार आहे.
नंदुरबार मध्ये 41 जण कोरोनामुक्त, वृद्धाचा मृत्यू
नंदुरबार - कोरोनाचा कहर वाढत असताना गुरुवारी शहादामधील एका 70 वर्षीय बाधित वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने संसर्गमुक्त झाले आहेत, तर दिवसभरात 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आहेत. जिल्ह्यात बाधितांची संख्या 537 झाली असून संसर्गमुक्तांची संख्या 378 आणि मृत्यूंची संख्या 30 झाली आहे.
सागवान लाकूड आणि सुतारकाम मशीन जप्त
नंदुरबार - नवापूर तालुक्यातील घोडझामण येथे अवैधरित्या ताज्या तोडीचे साग लाकुड व रंधा मशीनसह विविध साहित्य आढळून आले. या प्रकरणी वनविभागाने कारवाई करून सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
नवापूर तालुक्यातील घोडझामणे येथे गावीत यांच्या घराजवळील पडसाळीत वनविभागाच्या पथकाला साग लाकुडसाठा सापडला होता. अवैधरित्या ताज्या तोडीचे साग लाकूड साईज नग 45 घनमीटर 0.313 व रंधा मशिन, इलेक्ट्रीक मोटार, साहित्य मिळुन आल्याने सुमारे 1 लाखाचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वडेट्टीवारांनाच पालकमंत्रीपदी कायम ठेवा; युवक काँग्रेसकडून पत्र मोहीम
गडचिरोली - जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडेच देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली शहरात विरूगिरी आंदोलन केले होते. यानंतर आता राज्य सरकारला पत्र पाठवणे मोहीम सुरू केली आहे.
युवक काँग्रेसकडून राज्याचे मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना 10 हजार पत्र पाठविण्यात येणार आहेत. गडचिरोली विजय वडेट्टीवारांची कर्मभूमी आहे. त्यांची राजकीय जडणघडण या जिल्ह्यातूनच झाली. त्यांना जिल्ह्यातील समस्यांची जाण आहे. जिल्ह्याचा विकास घडून यावा याबाबत त्यांची तळमळ आहे. निसर्गाने गडचिरोली जिल्ह्याला भरभरून दिले आहे. परंतु, या येथील उपलब्ध साधनसंपत्तीवर आधारीत उद्योग निर्माण न झाल्याने जिल्हा उद्योग विरहीत व मागासलेला आहे. जिल्ह्याचा विकास घडवून आणायचा असेल धडाडीचे निर्णय घेणारा व जिल्ह्यातील समस्या शासनाच्या दरबारी लावून धरणाऱ्या नेत्याची गरज असून ही क्षमता वडेट्टीवार यांच्यामध्ये आहे, असे या पत्रांमध्ये स्पष्ट केले आहे.
नेट कनेक्टिव्हिटी कमी, खरीप विमा भरण्यापासून अनेक शेतकरी वंचित?
वाशिम- खरीप पीक विम्याचे आनलाईन अर्ज भरताना नेट कनेक्टिव्हिटी कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीकविमा काढण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे .
वाशिम जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र 4 लाख हेक्टर असून या खरिपाच्या पिकांना विमा संरक्षण मिळावे म्हणून जिल्ह्यातील 6 तालुक्यात 1 जुलै पासून पीकविमा काढण्यास सुरुवात झाली आहे. पीकविमा भरण्याची अखेरची मुदत 31 जुलै असली तरी 30 जुलै च्या सकाळपर्यंत पेरलेल्या क्षेत्रापेक्षा केवळ 30 टक्के म्हणजेच 1 लाख 21 हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचा विमा काढण्यात आला.