मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी झालेल्या सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपवला. तसेच सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले. याप्रकरणात 'मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला असून त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे एकप्रकारे षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दिली.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यावर मी राजकिय प्रतिक्रिया देणं योग्य नाही, ही एक कायदेशीर बाब आहे. मात्र, मुंबई पोलिसांना राज्याचे राजकारणी बदनाम करत असतील तर ते त्यांचं खच्चीकरण करणं आहे. याबाबत महाधिवक्ते अधिकृत भूमिका मांडतील', असे राऊत यांनी सांगितले. आपली न्यायव्यवस्था नेहमी पाहत आलं आहे. कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही. कोणी राजीनामा म्हटलं तर दिल्लीपर्यंत ते जाते. राजीनामा मागणीवर विचार करून टीका केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करणे योग्य नाही. न्यायव्यवस्था ही देशात सर्वोच्च पदावर आहे. हे प्रकरण न्यायालयच्या अखत्यारीत आहे यावर, मुंबई पोलीस आयुक्त, महाधिवक्ते बोलू शकतील, असे राऊत म्हणाले.
तर, या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा ही मागणी उठत आहे. कायदेशीर लढाईत असे होत असे. विरोधकांनी राजीनामा मागितला असेल तर त्यावर राज्याचे गृहमंत्री उत्तर देण्यास सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया यांनी विरोधकांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर केली. तसेच, याप्रकरणी महाधिवक्ते अधिकृत भूमिका मांडतील, असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.