मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आजपासून पुढील पाच दिवस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या पाच दिवसात शिवसेना संघटन वाढीसाठी ते नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.
पुढील वर्षाच्या प्रारंभी नाशिक महापालिकेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू असतानाच उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील पक्षसंघटनेचा आढावा घेतला जाणार आहे. चारही जिल्ह्यांतील पक्षसंघटनेतील पदाधिकाऱ्यांशी राऊत चर्चा करणार आहेत. तसेच लोकसभानिहाय आढावा घेणार आहेत
हेही वाचा - उठसूट केंद्रावर टीका करण्यापेक्षा समन्वय साधला तर राज्याचा विकास होईल - फडणवीस
राऊत यांचा दौरा -
आज (बुधवारी) मुंबई येथून ते नाशिककडे निघतील. सायंकाळी 5 वाजता नाशिक येथे ते गाडेकर, पांडे, कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यांचा मुक्काम नाशिकमध्ये असेल. यानंतर उद्या (गुरुवारी) 10 जूनला सकाळी 9.30 वाजता ते नाशिक येथून ते धुळ्याकडे प्रवास करतील. दुपारी 2 वाजता धुळे जिल्हा पदाधिकारी व लोकप्रतिनिधीसोबत बैठक घेणार आहेत. सायंकाळी 5 वाजता धुळे येथून नंदुरबारकडे ते प्रयाण करतील. नंदुरबार येथे रात्री त्यांचा मुक्काम असेल. यानंतर शुक्रवारी नंदुरबार व रावेर लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शनिवारी जळगावला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. तर रविवारी नाशिक व दिंडोरीतील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.