मुंबई: कोणत्याना कोणत्या मुद्द्याने चर्चेत राहणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. शुक्रवारी बाबा रामदेव यांनी महिलांच्या पेहरावावर भाष्य केल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. मोफत योग प्रशिक्षण कार्यक्रमाला संबोधित करताना रामदेव म्हणाले, महिला साड्यांमध्ये चांगल्या दिसतात. त्या सलवार सूटमध्ये छान दिसतात आणि मला वाटते की त्या काहीही न घालताही छान दिसतात. रामदेव बाबाच्या या वादग्रस्त विधानावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
भाजपचा समाचार घेतला जाईल: यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आज बुलढण्यात शेतकऱ्यांच्या भेटीला चालले आहेत. महाराष्ट्रातील सरकारचा शेतकऱ्यांवर कोणताच बरा वाईट परिणाम होत नाहीय. ठाकरे हेच खरं सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला जातोय. बुलढाणा संध्याकाळी जाहीर सभा आहे. अनेक विषयांवरती शिवसेना पक्षप्रमुख आपली भूमिका व्यक्त करतील. विशेषतः ज्या प्रकारचा महाराष्ट्राचा अपमान करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भात बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असतील या सर्वांचा समाचार आजच्या सभेतून घेतला जाईल, अशी माहिती राऊत यांनी दिली.
तिथं बेईमानांना थारा नाही: पुढे बोलताना राऊत म्हणाले की, या सर्व महाराष्ट्र विरोधी लोकांविरोधात आम्ही लढत आहोत. महाराष्ट्रातून अनेक राजकीय पक्ष, विरोधी पक्ष त्यांच्या पाठिंबा देत आहेत. आत्ताच माझ्याकडे भारतीय जय हिंद पार्टीचे नेते आले आणि त्यांनी सुद्धा आपला पाठिंबा जाहीर केला. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रमध्ये एक संतप्त वातावरण आहे. आणि सरकार कुठे आहे ? या विषयावर आता इथं न बोलता बुलढण्यातील सभेत आम्ही बोलू. आजची सभा ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष या मातेने आम्हाला दिला. ती राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या भूमीमध्ये आजची सभा आहे. आणि त्या भूमीत फक्त निष्ठा आणि इमान याचंच बीज रोवल गेलंय. तिथं बेईमानांना थारा नाही.
'या सरकारची जीभ दिल्लीत गहाण...: रामदेवबाबाच्या वक्तव्यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "हे अतिशय लज्जास्पद विधान आहे. त्यावेळी तिथे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या असं मला समजलं. त्याहून महत्वाचं म्हणजे हे सर्व होत असताना अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? असं विधान करणारा कोणीही असो कितीही मोठा असो त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला हवी. एका बाजूला तुम्ही महिलांच्या रक्षणाच्या गोष्टी करता, कायदे बनवता, ज्ञान पाजळता आणि त्याच वेळेला असंख्य महिलांसमोर एक बाबा भगवी वस्त्र घालून महिलांचा अपमान करतो. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तरी सरकार गप्प बसलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर सांगलीवर दावा केलाय तरी सरकार गप्प बसलंय. आणि आता रामदेव बाबा सारखे भारतीय जनता पक्षाचे महाप्रचारक महिलांविषयी अभद्र बोलतायत तरी सरकार गप्प बसलाय. सरकारची जीभ कुठे गहाण ठेवली आहे का दिल्लीला एवढंच मला पाहायचं आहे.