मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठीक आक्रमक होत पक्षाची भूमिका मांडली. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत आपण पालखीचे भोई होतो. आता यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच आता त्याच पालखीत शिवसैनिकाला बसवल्याशिवाय मी राहणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
मढ येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना आमदारांसोबतची बैठक संपली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदारांना मालाड येथील हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आले आहे. येथेच उद्धव ठाकरेंनी आमदारांसोबत बैठक घेतली. आदित्य ठाकरे कालपासूनच हॉटेल रिट्रीटमध्ये थांबले आहेत. दरम्यान, राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केल्यानंतर शिवसेनेकडून हालचालींना वेग आला आहे.
राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीए. शिवसेना आणि भाजपने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. तर, आजच्या बैठकीनंतर शिवसेनेची भूमिका आणि निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर, दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत असलेल्या भाजपला काल (शनिवारी) सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले. यावर राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठीचा अवधी वाढवून देण्याची मागणी भाजपकडून करण्याची शक्यता आहे.