मुंबई - कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि सामाजिक जबाबदारी म्हणून शिवसेना पक्षाचे आमदार-खासदार हे त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायत्ता निधीला देणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करताना दिसत आहे. वैद्यकीय आघाडीवरही युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे आर्थिक नुकसानही मोठे होणार आहे. त्यामुळे या संकटप्रसंगी शिवसेनेचे विधानसभा व विधान परिषदेचे सर्व आमदार, लोकसभा व राज्यसभेचे सर्व खासदार यांनी मदत निधीसाठी हात पुढे केला आहे. ते आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द करणार आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत माहिती दिली.
कोरोनाच्या संकटात मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सुनियोजित पद्धतीने उपाययोजना करत आहे. तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री राज्यातील जनतेला सर्वोतोपरीने सहाय्य करत आहेत. या लढाईत आपला देखील खारीचा वाटा असावा म्हणून शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडे संबंधितांनी धनादेश जमा करावेत, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.