मुंबई - भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरांतावर टीका केली होती. त्यानंतर थोरातांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. या वाक् युद्धानंतर आता शिवसेनेने मुखपत्र सामनातून राधाकृष्ण विखेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. सत्तेत नसलेल्या विखेंची माशाप्रमाणे अवस्था झाली आहे. त्यातून त्यांना जे वैफल्य आले आहे, त्यामुळेच भाजपमध्ये जाऊन काहीच फायदा न झाल्याची जी चिड आहे, त्या चिडीतूनच ते टाळूवरचे केस उपटत असतील, अशी बोचरी टीका केली आहे.
पक्ष संकटात असताना ज्यांनी उंदरांप्रमाणे उड्या मारल्या नाहीत व बुडते जहाज वाचवण्याचे प्रयत्न केले अशांना इतिहासाच्या पानावर स्थान मिळते. अशा एखाद्या पानावर विखे-पाटील कोठे आहेत काय? विखे-पाटलांनी काँग्रेसचा त्याग केल्याने काँग्रेसचे नुकसान झाले नाही व भाजपमध्ये गेल्याने भाजपचा दीडकीचा फायदा झाला नाही. विखे यांनी ऐनवेळी पलायन केले नसते तर आज ते सरकारात काँग्रेसचे नेते असते. ती जागा नियतीने थोरातांना मिळवून दिली. कोलांटउडीचे डोंबारी राजकारण प्रत्येकवेळी चालतेच असे नाही. विखे-पाटील यांनी भाजपवर काय काय मळीच्या गुळण्या टाकल्या आहेत हे त्यांनीच एकदा आठवून पाहावे. विखे-पाटील अधूनमधून बोलतात, आम्ही भाजपमध्ये खूश आहोत. जे विखेंना ओळखतात ते यावर विश्वास ठेवणार नाहीत. झक मारली आणि भाजपमध्ये गेलो या चिडीतूनच ते टाळूवरचे केस उपटत असतील. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय, अशी टिका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामन्याच्या अग्रलेखातून सेनेने केली आहे.
बाटग्यांमुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली
संकटकाळात सगळ्यात जास्त काम हे विरोधी पक्षालाच असते. राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण, विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत. पण, भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्या बाटग्यांचे आश्चर्य वाटते. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणार्यांना महाराष्ट्र माफ करीत नाही हे त्या प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले. विखे-पाटील हे तर विरोधी पक्षनेते असतानाच भाजपमध्ये विलीन झाले. अशी हिंमत (लाचारी नव्हे!) अंगात भिनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. थोरात वगैरे मंडळींचे कष्ट त्या दिशेने तोकडे पडले इतकेच म्हणावे लागेल.
विखे तडफडणाऱ्या माशांचे प्रतिनिधी
विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात. विखे काँग्रेस पक्षात होते. त्यांचे आजचे वैभव व साम्राज्य ही काँग्रेसचीच दिलदारी आहे. आजचा तालेवारपणा ही काँग्रेसचीच देणगी आहे. नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या खाटेवर ते व त्यांचे घराणेच आतापर्यंत पाय लांब करून बसले होते. पण, एक दिवस विखे यांनी सहकुटुंब शिवसेनेत प्रवेश केला. राज्यात व केंद्रात मंत्रिपदे भोगली व नंतर पुन्हा काँग्रेस पक्षात जाऊन सत्ताधारी झाले. काँग्रेसकडून सत्तापद भोगले व 2019च्या निवडणुकीपूर्वी ते फडणवीसवासी झाले. सध्याच्या कुटील राजकारणात यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यता नाही. पण, स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे पाहायचे वाकून या विकृतीने तरी कळस गाठू नये. विखे यांनी थोरातांवर हल्ला केला. का, तर बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण हे काही मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांच्याशी तासभर चर्चा केली. ही चर्चा राज्यापुढील संकटासंदर्भात होती. चर्चेनंतर आपले समाधान झाले असल्याचा खुलासा थोरात यांनी केला. म्हणजे, महाविकास आघाडी स्थिर व मजबूत असल्याची ग्वाहीच थोरातांनी दिली. यावर विखे-पाटलांच्या पोटात खळबळ माजण्याचे कारण काय? विखे हे सध्या काँग्रेस पक्षात नाहीत. ते सध्या ज्या पक्षात आहेत त्याबाबत त्यांनी बोलावे. पण, सत्ता नसेल तर पाण्याशिवाय तडफडणार्या माशांप्रमाणे काही मंडळींची तडफड होते. विखे त्याच तडफडणार्या माशांचे प्रतिनिधी आहेत.
विखेंच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते
जगभरातील विनोदी साहित्यात विसराळूपणा हे विनोदाचे अंग बनले आहे. मराठी रंगमंच आणि पडद्यावरही ‘विसराळू’ पात्र खास आणून विनोद निर्माण केला जातो. अशा विसराळू पात्रांत आता नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे-पाटलांची भर पडली आहे. ते विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहेत याचे प्रयोग ते स्वतः अधूनमधून करीत असतात. विखे महाशयांनी दोनेक दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याबाबत असे महान भाष्य केले की, एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत. यावर शांत बसतील ते थोरात कसले! थोरातांनीही सांगितले की, ‘‘मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे!’’ यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली. काचेच्या घरात राहणार्यांनी दुसर्यांच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे. विखे अनेक वर्षे काँगेस पक्षात होते हा आता इतिहास झाला. वरचेवर पक्ष बदलण्याची कला त्यांना अवगत आहे व आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. लाचारी व बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते, असे म्हणत शिवसेनेने सामन्यातून राधाकृष्ण विखे-पाटलांचा समाचार घेतला
हेही वाचा - 'थोरातांचे कर्तृत्वच काय? ते तर मातोश्रीचे उंबरठे झिजवताहेत'