मुंबई - मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहासह विधानसभा निवडणूक प्रचारावेळी म्हणाले होते. हाच धागा पकडून 'गप्प बसा' असे त्यांना सुनावणारा फलक शिवसेनेकडून लावण्यात आला आहे. या बॅनरवर संजय राऊत यांचा फोटो छापण्यात आला आहे. राऊत यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कांजूरमार्ग पूर्वेला वर्दळीच्या रस्त्यावर हे फलक लावण्यात आले आहे.
हेही वाचा - शिवसेनेकडे असलेले संख्याबळ सभागृहात दाखवू - संजय राऊत
शिवसेना बॅनरबाजी करत असताना भाजप मात्र शांत आहे. अद्याप तरी भाजपने शिवसेनेच्या या बॅनरबाजीला प्रत्युत्तर दिलेले नाही. विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप पूर्व हे विभाग शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत विक्रोळी विधानासभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या ठिकाणी कट्टर शिवसैनिक राहत असल्याने ही बॅनरबाजी करण्यात आली असल्याची लोकांमध्ये चर्चा आहे.