जळगाव - राज्यात भाजप-सेना युती तुटून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. जळगाव महापालिकेत मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप-सेना एकत्र आली आहे. भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेसह सर्वपक्षांच्या सदस्यांनी उपस्थिती देत पाठिंबा दिल्याने महापालिकेची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज (गुरुवारी) भाजपच्या नगरसेविका भारती सोनवणे यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. शुक्रवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असली तरी सोनवणेंची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
जळगाव महापालिकेसाठी ऑगस्ट २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ७५ पैकी ५७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. तर शिवसेनेला १५ आणि एमआयएमला ३ जागा मिळाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खातेदेखील उघडता आले नाही. बहुमत असलेल्या भाजपने अंतर्गत बैठकीत त्यावेळी ५ वर्षापैकी सव्वा-सव्वा वर्ष भाजपच्या चार सदस्यांना महापौरपदाची संधी द्यावी, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम संधी मिळालेल्या आमदार सुरेश भोळेंच्या पत्नी सीमा भोळे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर पदासाठी नगरसेविका भारती सोनवणे यांची उमेदवारी निश्चित केली. त्यानुसार भारती सोनवणे यांनी भाजपकडून महापौरपदासाठी ४ अर्ज सादर केले. या अर्जांवर सीमा भोळे, मयूर कापसे, शुचिता हाडा, सुरेखा तायडे, भगत बालाणी, राजेंद्र पाटील, जितेंद्र मराठे, सरिता नेरकर यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्या.
हेही वाचा - 'समाजात फूट पाडणाऱ्या भाजपबद्दल विचार करावाच लागेल'
शिवसेनेसह एमआयएमचा पाठिंबा -
भाजपच्या भारती सोनवणे यांनी अर्ज भरला त्यावेळी भाजपच्या सदस्यांसह महापालिका सभागृहात प्रमुख विरोधक असलेल्या शिवसेना आणि एमआयएमच्या सदस्यांनी देखील उपस्थिती देत सोनवणे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते सुनील महाजन, ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा तर एमआयएमकडून रियाज बागवान उपस्थित होते.
भाजप-सेना युतीच्या घोषणा -
महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप, शिवसेनेच्या सदस्यांनी एकत्रित फोटोसेशन केले. यावेळी भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी 'भाजप-सेना युतीचा विजय असो' अशा घोषणा दिल्याने सभागृहातील सर्वांच्या भुवया उंचावल्या.
हेही वाचा - बाळासाहेबांना दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती आज आम्ही करतोय - परिवहन मंत्री
विकासासाठी समन्वय - सुनील महाजन
महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. तसेच शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप नेते माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शहराच्या विकासाठी समन्वय रहावा, म्हणून महापौर निवड बिनविरोध करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती सेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली.
विकासासाठीच एकत्र आलो - भगत बालाणी
गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार शहराच्या विकासासाठी महापौर निवडणुकीत भाजप-सेना ही नैसर्गिक युती झाल्याची माहिती भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी दिली. यातून राज्यात देखील विकासाचा संदेश जाईल, असेही ते म्हणाले.