मुंबई- एकीकडे शिवसेना-भाजप यांची युती होणार असल्याचे निश्चित असताना दुसरीकडे या दोन पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये मात्र जमत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. असाच प्रकार गोवंडी येथील पालिकेच्या शताब्दी रुग्णालयाच्या भूमिपूजनादरम्यान पाहायला मिळाला आहे. रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या श्रेयावरून सेना-भाजप आमने सामने आले आहे.
५८० खाट असलेल्या या भव्य पालिका रुग्णालयाचा आज भूमिपूजन कार्यक्रम आहे. या प्रसंगी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते या रुग्णालयाचे भूमिपूजन पार पडणार आहे. मात्र रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे श्रेय घेत स्थानिक शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी विभागात आणि कार्यक्रम स्थळी मोठे फ्लेक्स लावले आहेत. तर भाजपच्या नगरसेविका अनिता पांचाळ यांनी देखील या कामाच्या श्रेयाचे आणि भूमिपूजनाचे फ्लेक्स लावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सेना भाजप यांचा वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे.