मुंबई - गोरेगाव आरे येथे मेट्रो कारशेड प्रकल्प सुरू होणार आहे. दरम्यान त्यासाठी मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या भागातील तब्बल २२०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला होता. झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने आजही विरोध केला आहे. झाडे तोडण्याचा विरोधात आलेल्या 80 हजार तक्रारींची तसेच २७ आदिवासी पाड्यांचे काय होणार, याची सविस्तर माहिती पालिका प्रशासनाने द्यावी, अशी शिवसेनेने मागणी केली आहे.
शहरात मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी शहरातील हिरवळ असलेल्या गोरेगाव येथील आरेची जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, कार शेडसाठी २२०० झाडे कापण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला आहे. ही झाडे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या कार डेपोच्या बांधकामात अडथळा ठरत असल्याने हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
झाडे कापण्यास शिवसेनेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध
मात्र, झाडे कापण्यास शिवसेनेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध होत असल्याने हा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. दोन वर्षांनंतर मागील आठवड्यात हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रकल्पामुळे २७ आदिवासी पाडे विस्थापित होण्याचा, तसेच त्या पाड्यातील नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वृक्ष प्राधिकारणाच्या सदस्यांनी काल आरे परिसराला दिली भेट
आरेमधील झाडे ज्या ठिकाणी तोडण्यात येणार आहेत त्या ठिकाणाला वृक्ष प्राधिकारणाच्या सदस्यांनी काल भेट दिली. या भेटीदरम्यान आठवड्याभरापूर्वी जागेची पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांचा आक्रोश आम्ही पाहिला. नागरिकांचा झाडे तोडण्याला विरोध आहे. त्याबाबत दोन खटले न्यायालयात सुरु आहेत. येथील २७ आदिवासी पाड्यांचे पुढे काय होणार? झाडे तोडण्याच्या विरोधात तब्बल ८० हजार तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. त्या तक्रारींना पालिकेने काय उत्तर दिले. याची सविस्तर माहिती पालिका प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण समितीला दिलेली नाही. ही माहिती समितीला द्यावी, अशी मागणी केल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले आहे.
कारशेड इतर ठिकाणी बांधा
मेट्रो कार शेडबाबत त्रिसदस्य समिती नेमण्यात आली होती. आरे कॉलिनीत होणारी संभाव्य मोठी वृक्षतोड टाळण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने दोन पर्याय सुचविले होते. त्यात कारशेडसाठी आरे कॉलनी ऐवजी कांजूरमार्ग येथील जागेचा पर्याय सुचविण्यात आला आहे. शिवसेनेचा झाडे तोडायला विरोध असल्याने आरे ऐवजी पर्यायी जागेवर कारशेड उभारावे असे आवाहन यशवंत जाधव यांनी केले आहे.