मुंबई - कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा शिवसेनेकडून ठिकठिकाणी आंदोलन करुन निषेध व्यक्त केला जात आहे. रविवारी (दि. 9 ऑगस्ट) दुपारी शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन केले.
माजी महापौर व नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या वतीने शिवसेना भवनासमोर हे आंदोलन करण्यात आले. कर्नाटक सरकार व मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतल्याने पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली, तर काही शिवसैनिक थेट पोलिसांच्या गाडीवर चढून घोषणाबाजी करू लागले होते.