मुंबई : शिवसेना उत्तर प्रदेशमध्येही विधानसभा निवडणूक लढणार आहे. 'गोव्यात आम्ही निवडणूक नक्की लढतो आहोत. उत्तर प्रदेशमध्ये देखील 80 ते 90 जागा लढविण्याचा विचार सुरू आहे. तशी आमच्या पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे', असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
गोव्यात सेना 20 जागा लढवणार?
2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांबाबत उत्सुकता वाढणार आहे. आता शिवसेनेनंही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. त्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. तसेच, गोवा प्रदेशमध्येही सेना 20 ते 21 जागा लढवणार आहे, असेही राऊतांनी म्हटले आहे.
भाजपवाल्यांना अफवा पसवण्यात आनंद मिळतो - राऊत
'चंद्रकांत दादा असा हवेत गोळीबार करून चालत नाही. कोणी कोणाच्या थोबाडीत वगैरे मारत नाहीत. चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आणखी कोणी लोक असतील, ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात. त्यांना अशा कामात आनंद मिळतो, त्यानी तो आनंद घ्यावा. पण वारंवार हेच सांगतो की हे सरकार पुढील तीन वर्ष देखील उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतर देखील महा विकास आघाडी सत्तेवर येईल', असे राऊतांनी म्हटले.
'मुख्यमंत्री बदलने हा त्या राज्याचा पक्षांतर्गत विषय'
'एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बदलणे हा त्या राज्याचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याच्यावरती इतरांनी भाष्य करण्याची गरज आहे. गुजरात राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती तितकीशी बरी नाही', असे गुजरातच्या राजकारणावर राऊत म्हणाले. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काल राजीनामा दिला आहे. त्यामुळे तेथील नवीन मुख्यमंत्र्याच्या नावाकडे लक्ष लागले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये अनेक शेतकरी संघटनांचा सेनेला पाठिंबा
'उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी संघटना आहेत. या संघटनांनी सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणूक लढा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. इतर काही लहान पक्ष आहेत. त्यांना देखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे', असे राऊत म्हणाले.
गोव्यात आघाडी होणार?
'गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याचा विचार आहे. त्याला कितपत यश येते त्यासंदर्भात निश्चित काही सांगता येणार नाही. पण त्या संदर्भात हालचाली सुरू आहेत. त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगले स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकेल', असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो. शेतकर्यांच्या आंदोलनाला संपूर्ण देशातून समाधान मिळणं गरजेचे आहे, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा - मुख्यमंत्री स्तरावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणावर चर्चा होईल - जलसंपदा मंत्री