मुंबई - शिवसेनेने हिंदुत्व सोडून भ्रष्टाचारी असलेल्या पक्षांसोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे धारावी येथील 400 शिवसैनिक हिंदुत्वावर ठाम असणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत.
शिवसेनेने हिंदुत्व जपलं नाही म्हणून शिवसैनिकही शिवसेनेत राहणार नाहीत, अशी भूमिका घेत त्यांनी आज पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसैनिक हे आज सायंकाळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, स्थानिक आमदार कॅप्टन सेलवन, आमदार सुनिल राणे तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
हिंदुत्व मुद्द्यावर शिवसैनिक हे शिवसेनेशी जोडले गेले होते. परंतु, सत्तेत येण्यासाठी शिवसेनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपशी हिंदुत्वावर मित्रता न ठेवता सत्तेच्या लाभापोटी भ्रष्टाचारी असलेल्या पक्षाबरोबर हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेना विसरत आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले शिवसैनिक हे आज भाजपबरोबर जात असल्याचे, असे रमेश नाडार यांनी सांगितले.
हेही वाचा - जागतिक दिव्यांग दिन - 2 फुटाच्या नयनाची परिस्थितीवर मात करत शिकण्याची जिद्द