मुंबई : येत्या 27 फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. पाच आठवड्यांचे हे अधिवेशन असेल. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ५५ आमदार निवडून आले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे चाळीस आमदार त्यांच्यासोबत गेले. तर १५ आमदार ठाकरेंसोबत राहिले. ठाकरे गटाने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासहित १६ आमदारांना अपात्र करावे, अशी याचिका दाखल केली आहे. २१ फेब्रुवारीपासून होणाऱ्या सुनावणी वेळी निकाल येण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्ष शिंदे गटाला मिळाला : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवसेना पक्ष शिंदे गटाला मिळाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतोद पदी भरत गोगावले यांची निवड केली आहे. तर ठाकरे गटाने सुनील प्रभू यांच्याकडे विधिमंडळातील प्रत्येक पद सोपवले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे प्रतोद प्रभू यांनी १६ जणांना पक्षादेश लागू करत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तर शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या १५ आमदारांना पक्षादेश लागू केला होता. हा वाद न्यायप्रविष्ट असताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे अधिवेशनात पक्षादेश कोणाचा लागू होणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अपात्रतेची टांगती तलवार : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. येत्या २१ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाकडून येणाऱ्या निकालापूर्वी नव्याने आयोगा विरोधातील याचिका मांडली जाणार आहे. यावर पुन्हा सुनावणी झाल्यास विलंब होऊ शकतो. अशातच, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असल्याने त्यात कोणाचा व्हीप लागू होणार? प्रतोद गोगावले यांनी बजावलेल्या व्हीपला अधिकृत मान्यता असणार आहे का ? ठाकरे गटाच्या आमदारांनी व्हीप न पाळल्यास अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्यावर राहील का.? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेची गोची करणारा ठरणार आहे.
खासदार आणि पदाधिकारी टिकवण्याची कसरत : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिले. उद्धव ठाकरे यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह यावरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. शिवाय पक्षातील आमदार, खासदार आणि पदाधिकारी टिकून ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आमदार आणि खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीबाबत रणनीती आजच्या बैठकीत ठरवली जाणार आहे.
हेही वाचा : Thackeray Group Meeting : उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदार, खासदारांची बैठक! ठाकरे गटात अस्वस्थता कायम