मुंबई - विधान परिषदेच्या चौदाव्या उपसभापती म्हणून आज शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची आज निवड झाली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली.
विधानपरिषदेत उपसभापतीच्या निवडी संदर्भात सभापती रामराजे नाईक यांनी कार्यक्रम जाहीर करताच सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. या गोंधळातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी सभागृहात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. या घोषणाबाजीतच सभापतींनी नीलम गोऱ्हे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीलम गोरे यांची उपसभापती निवड झाल्याने त्यांचे स्वागत केले. तर उपमुख्यमंत्र्यांनी नीलम गोऱ्हे यांचा परिचय सभागृहाला करून दिला. विरोधकांनी या विषयीचा प्रश्न न्यायालयात असताना सभापतीची निवड कशी करतात, असा आक्षेप घेत सरकारच्या विरोधात घोषणा देत सभात्याग केला.
कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक ज्येष्ठ नेते सभागृहात नाहीत, अशा स्थितीमध्ये सभागृहात उपसभापतीच्या निवडीसाठी निवडणूक जाहीर कशी केली जाते, असा सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित करून सभागृहाचे कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. तसेच याविषयी न्यायालयात गुरुवारी निकाल येणार असताना सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे, असा आरोप करत सरकार अशाच प्रकारे आपले कामकाज रेटून धरत असेल तर आम्ही सभात्याग करतो, असे सांगत घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.
आम्हाला मुलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करत आहे. काही करून हे सरकार उपसभापतीची निवडणूक रेटून नेत असल्यामुळे आम्हाला सभात्याग करावा लागला आणि मोठ्या प्रमाणात सरकारकडून अधिकाराचा गैरवापर होताना दिसतोय म्हणूनच सरकारने ही निवडणूक रेटून नेली असा आरोपही दरेकर यांनी केला.