मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज चौदा दिवस झाले. तरीही सत्तास्थापनेसाठी सेना-भाजपात रस्सीखेच सुरू आहे. सध्या सत्तास्थापनावरून महाराष्ट्राचे राजकारण तापत बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाची खलबतं सुरू आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपचे काही लोक नवनिर्वाचित आमदांराना पैशाचे अमिष देत असल्याचा आरोप सेनेने सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.
पाळणा हलणार का..?
राज्याचे मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे दोन दिवसांपासून वारंवार 'गोड बातमी'चे दाखले देत आहेत. आतात ही गोड बातमी म्हणजे नेमकी कोणती ?, सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे लग्न ठरले आहे ?, आपल्याकडे गोड बातमीचा संबंध लग्न किंवा बारशाशी जोडला जातो. पण, गोड बातम्यांचे कितीही दाखले दिले तरी पाळणा हलणार का?, तो कसा हलेल? हे प्रश्न आहेतच असे म्हणत, सेनेचाच मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार हीच गोड बातमी महाराष्ट्रासाठी आहे, असे शिवसेनेने सामनातून म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या नशिबात एक स्वाभिमानी सरकार येणार आहे तसे भाग्य मराठी जनतेत आहे. ती भाग्यरेषा पुसण्याची ताकद कुणाच्यातही नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून गोड बातमीच्या वक्तव्यावरुन सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेण्यात आला आहे.