मुंबई - मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणूक तोंडावर आली असतानाच बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी आपण स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याचे वक्तव्य करत असला तरी त्याचा फायदा मात्र मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपला होणार आहे, अशी माहिती राजकीय विश्लेषकांनी दिली आहे.
भाजपचे शिवसेनेला आव्हान -
मुंबई महानगरपालिकेत गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेच्या काळात भाजपही शिवसेनेचा मित्रपक्ष होता. २०१४ साली केंद्रामध्ये आणि राज्यात भाजप सत्तेत येताच भाजपने मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली. २०१६ मध्ये मुंबईमधील वॉर्डची पुनर्रचना केली. त्यामाध्यमातून २०१७ च्या निवडणुकीत भाजपने एकट्याने निवडणूक लढवून आपले ८२ नगरसेवक निवडून आणले. २०१२ च्या निवडणुकीत भाजपचे ३२ नगरसेवक होते. मात्र २०१७ मध्ये सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने नगरसेवक निवडून आणल्याने भाजपने सत्ताधारी शिवसेनेला आव्हान दिल्याचे स्पष्ट झाले.
सर्वांचाच स्वबळाचा नारा -
मुंबई महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोनच मोठे राजकीय पक्ष म्हणून समोर आले आहेत. पुढील पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळावर निवडणूक लढवू, असे स्पष्ट केले आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनीही मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढवू, असे म्हटले आहे. काल राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे बहुतेक सर्वच राजकीय पक्ष महापालिका निवडणूक स्वबळावर लढतील, असे चित्र निर्माण झाले आहे.
स्वबळाचा शिवसेना आणि भाजपला फायदा -
मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होत आहे. ही निवडणूक होण्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवू असे म्हटले आहे. याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार, असे सांगितले जात होते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी स्वबळावर निवडणूक लढवू, असे म्हटले जात असावे. महापालिकेत गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचा एक मतदारवर्ग आहे, जो शिवसेनेलाच मत देतो. २०१७ च्या निवडणुकीत भाजपला ८२ जागा मिळाल्या. यामुळे स्वबळावर सर्वच राजकीय पक्ष लढल्यास त्याचा फायदा शिवसेना आणि भाजपलाच होईल, अशी शक्यता जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक सुनिल शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई महापालिकेतील सध्याचे पक्षीय बल
- शिवसेना – ९७
- भाजप – ८३
- काँग्रेस – २९
- राष्ट्रवादी – ८
- समाजवादी पक्ष – ६
- मनसे – १
- एमआयएम – २
- अभासे – १
हेही वाचा - कलम 370 रद्द केल्यानंतर 'इतक्या' लोकांनी काश्मीरात घेतली जमीन, सरकारने लोकसभेत दिली माहिती