मुंबई - आमदार योगेश कदम हे मुंबईच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ एका भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात आमदार योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे. मात्र, ते सुखरूप आहेत. यामध्ये त्यांच्या चालकाला देखील किरकोळ दुखापत झालेली आहे अशीही सूत्रांची माहिती आहे. (Shinde group MLA Yogesh Kadam) दरम्यान, आई जगदंबेच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने मी माझे सर्व सहकारी सुखरूप आहेत. आपण कोणीही आमची चिंता करू नका. एका मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो आहोत. मला कोणत्याही पद्धतीची दुखापत झालेली नाही. त्यासोबतच माझे पुढील सर्व नियोजित कार्यक्रम नियोजित वेळेवर पार पडणार आहे अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली आहे.
पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली - आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असताना कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने कदम यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या घटनेनंतर टँकर चालक लगेच पळून गेल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर मुंबईला रवाना - अपघातानंतर आमदार योगेश कदम हे मुंबईला दुसऱ्या वाहनाने रवाना झाले. तर, अपघातानंतर टँकरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. आमदारांच्या कारला धडकल्यानंतर टँकर उलटला असल्याची प्राथमिक माहिती आहे. शिंदे गटातील शिवसैनिकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. दरम्यान, या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला मार लागला आहे. तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
उपघातांचे सत्र - गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेत्यांबाबत अपघाताचे सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत येथे नुकताच अपघात झाला आहे. ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या अपघातामध्ये मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली होती. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला होता. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते.
गोरे यांना डिस्चार्ज - भाजप आमदार जयकुमार गोरे यांना अनेक दिवसांच्या उपचारानंतर आज (शुक्रवार 6 जानेवारी) 12 दिवसांनी अखेर डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्यामुळे गोरे यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. मला पुनर्जन्म मिळाला असून हा जन्म आता जनतेच्या सेवेत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशी भावना गोरे यांनी डिस्चार्जनंतर व्यक्त केली आहे. एवढ्या लवकर आपल्याला कुणी घेऊन जाऊ शकते, अजून खूप लढाया, संघर्ष करायचा आहे. परमेश्वराने एवढ्या संकटातून मला पुन्हा आपल्यासोबत पाठवले आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.