मुंबई - विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मागील आठवड्यातच उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. भेटीदरम्यान काय चर्चा झाली याचा मजकूर गुलदस्त्यातच होता. मात्र, रविवारी खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही - खासदार संजय राऊत यांनी रविवारी दावा केला की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच उद्धव ठाकरेंना सांगितले की राष्ट्रवादी भाजपशी कधीही हातमिळवणी करणार नाही, जरी कोणी वैयक्तिक निर्णय घेतला तरीही राष्ट्रवादी हा पक्ष भाजपसोबत जाणार नाही.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे राज्यातील सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी करण्यासाठी गटबाजी करू शकतील, अशी अटकळ असताना राऊत यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शाह, अजित पवार भेट नाही - भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत, असे म्हणत अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा दावा फेटाळला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱयावर आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी अमित शाह यांच्यात शनिवारी बैठक झाली असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे ही चर्चासुद्धा निराधार असल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
कोणी वैयक्तिक पक्ष सोडला तर तो निर्णय त्यांचा - शरद पवार यांनी मंगळवारी झालेल्या भेटीत उद्धव ठाकरेंना सांगितले की, कोणीही पक्षांतर करू इच्छित नाही. परंतु, कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे. कोणी सोडण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला तर तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. पण एक पक्ष म्हणून आम्ही कधीही भाजपसोबत जाणार नाही, असे आश्वासन शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
शिंदे सरकारविरोधात जनतेत नाराजी - सध्याच्या राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. भाजपमध्ये प्रवेश करणारा कोणीही राजकीय नेता नाही. त्यामुळे सध्या होत असलेल्या चर्चा फक्त पेरल्या जात आहेत. त्यात काहीच तथ्य नाही, असेही खासदार संजय राऊत यांनी रविवारी सांगितले.