मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा दिवसेंदिवस देशात प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्या गरीब मजुरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन वाढत असल्यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांनी त्यांच्या मूळ राज्यात परतायला सुरुवात करत आहेत. पण काही राज्यांचे मुख्यमंत्री या मजुरांना घ्यायला तयार नाहीत. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मजुरांना न स्वीकारणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून हस्तक्षेप करावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवारांनी ट्वीट करुन पंतप्रधानांना विनंती केली आहे. लॉकडाऊन वाढत असल्यामुळे अनेक परप्रांतीय मजूर पायीच चालत निघाले आहेत. तर काही ठिकाणची राज्य ही या मजुरांनी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी बोलून मार्ग काढावा अशी विनंती पवारांनी केली आहे.
परप्रांतीय मजुरांच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा केल्याचेही पवारांनी सांगितले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या मजुरांच्या प्रवासासाठी एसटी बस उपलब्ध करून देऊ, असं सांगितलं. तसेच रेल्वे मंत्र्यांनीही या मजुरांच्या प्रवासासाठी रेल्वेची सोय करून देऊ, असं सांगितल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.