मुंबई Sharad Pawar : इस्रायल आणि हमास युद्धादरम्यान गाझामध्ये युद्धबंदीसाठी जॉर्डननं संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव सार्वमतानं मंजूर करण्यात आला. या ठरावाच्या बाजूनं १२० मतं पडली, तर विरोधात फक्त १४ मतं पडली. त्याचवेळी भारत, कॅनडा, जर्मनी आणि ब्रिटनसह ४५ देश या मतदान प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत.
शरद पवारांची टीका : गाझामध्ये युद्धबंदीचं आवाहन करणाऱ्या या ठरावापासून भारतानं स्वतःला दूर ठेवल्याबद्दल विरोधकांनी आता सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी यावरून सरकारला धारेवर धरलं. 'पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारत सरकारमध्ये संभ्रम आहे. भारताचं धोरण इस्रायलला नव्हे तर पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याचं होतं. पॅलेस्टाईनमध्ये हजारो लोक मरत आहेत. मात्र भारतानं याला कधीही पाठिंबा दिला नव्हता. सध्याच्या सरकारमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे', असं शरद पवार म्हणाले.
प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. भारताच्या या पावलामुळे मला धक्का बसला असून मला लाज वाटत आहे, असं त्या म्हणाल्या. जेव्हा मानवतेचा विषय येतो आणि प्रत्येक कायदा बाजूला ठेवला जातो, अशा वेळी भूमिका न घेणं किंवा मूकपणे बघत राहणं चुकीचं आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
ओवेसींनीही धारेवर धरलं : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून सरकारला धारेवर धरलं. 'मोदी सरकारनं मानवतावादी युद्धविरामाच्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावावर मतदान करण्यापासून दूर राहणं हे धक्कादायक पाऊल आहे. इस्रायलनं गाझामध्ये ७०२८ लोकांची हत्या केली. यामध्ये ३००० हून अधिक मुलं आणि १७०० महिलांचा समावेश आहे. गाझामधील किमान ४५ टक्के घरं उद्ध्वस्त झाली. १४ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले. गाझा पूर्णपणे मानवतावादी मदतीवर अवलंबून आहे, असं ओवैसी म्हणाले.
हेही वाचा :
- Sharad Pawar befitted reply to PM Narendra Modi : शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना सडेतोड प्रत्युत्तर, कृषीमंत्री असताना शेतीक्षेत्रातील प्रगतीचा वाचला पाढा
- Gaza West Bank Relation : युद्धात वारंवार उल्लेख होणाऱ्या गाझा, वेस्ट बँक आणि पॅलेस्टाईन यांच्यात संबंध काय, जाणून घ्या
- Israel Palestine Conflict : 100 लढाऊ विमानांचा गाझावर हल्ला; कारवाई तीव्र करण्याचा इस्रायली सैन्यानं दिला होता इशारा