मुंबई : २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शरद पवार यांच्या या निर्णयाने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नाही तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेसमध्ये सुद्धा मोठा भूकंप झाला आहे. शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. त्यांनी त्यांच राजकीय कौशल्य अनेकदा दाखवून दिलं आहे. २०१४ साली केंद्रात मोदी सरकार आल्यापासून राज्यामध्ये काही राजकीय उल्थापालथ सुरू होती.
सरकार बनवण्यात यशस्वी : ती पाहून २०१९ च्या निवडणुकीच्या निकालाचा त्या नंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री पदावरून झालेल्या बिघाडीचा पूर्णपणे फायदा घेत शिवसेना, काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना एकत्र आणून महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शरद पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या यांच्या विरुद्ध टोकाच्या भूमिकेला असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत आणून सरकार बनवण्यात ते यशस्वी झाले होते. ज्या कारणामुळे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेव्हा बंड पुकारून ४० आमदार शिवसेनेतून फोडले होते. अशा परिस्थितीत शरद पवार यांचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.
वज्रमुठ संकल्पना शरद पवारांची : सध्या राज्यात मोदी सरकार तसेच शिंदे - फडणवीस सरकार विरोधात महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा सुरू आहेत. या वज्रमूठ सभेच्या संकल्पने मागे सुद्धा शरद पवारांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांचा हा निर्णय महाविकास आघाडी साठी झटका देणारा आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सध्या ज्या काही राजकीय कुरघोडी सुरू आहे. त्याचे महत्त्वाचे कारण हे अजित पवार आहेत.
शरद पवार अस्वस्थ ? अजित पवारांची सध्याची संशयास्पद भूमिका त्यातच २०१९ साली देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ, हा पूर्व इतिहास बघता शरद पवार सुद्धा आत्ताच्या घडीला थोडे अस्वस्थच आहेत. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललेल्या अंतर्गत कुरघोडीचा परिणाम महाविकास आघाडीवर होऊ नये अशी त्यांची जरी इच्छा असली तरीसुद्धा त्यांचा हा निर्णय महाविकास आघाडी साठी घातकच आहे.
महाविकास आघाडी साठी झटका : महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडीमध्ये अनेक मतभेद झाले. पण या सर्व मतभेदांना दूर सारून महाविकास आघाडी भक्कम ठेवण्याचं काम शरद पवार हे सातत्याने करत आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा असो किंवा गौतम अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करण्याचा मुद्दा असो. या मुद्द्यांवरून सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यात मतभेद झाले, आजही ते आहेत. परंतु या सर्व मतभेदांना दूर ठेवत मोदी सरकार विरोधात एकजूट कशी बांधता येईल हे फक्त राज्यात नाही तर देश पातळीवर करण्याचं काम शरद पवार करत असताना, त्यांचा हा निर्णय सर्वांना झटका देणारा आहे.