मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. या संदर्भात शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आहे. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्षपद देण्याबाबत शरद पवारांनी अजित पवारांशी चर्चा केल्याचे सुत्राने सांगितले.
शरद पवार यांनी लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रकाशन केले. महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या शिवसेना संपवण्याचे कट कारस्थान, उद्धव ठाकरे, शिवसेनेकडे केलेले दुर्लक्ष आधी विविध विषयांवर बारकाईने टिप्पणी केल्या आहेत. या पुस्तकाची उत्सुकता लागून असताना आज प्रकाशनानंतर शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ही निवृत्ती केवळ अध्यक्ष पदाची असून सामायिक, राजकीय नाही असा खुलासा केला.
जयंत पाटीलांना अश्रू अनावर : पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भावनिक झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अनेकांना अश्रू अनावर झाले. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही, असा अर्थ होत नाही, असे सांगत रडणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलेच फटकारले. तरीही कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची घोषणा मागे घ्यावी, असा पवित्रा घेत, जोरदार घोषणा केली. एक भावनिक वातावरण तयार झाल्यानंतर शरद पवार आपली घोषणा मागे घेतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे.
राजीनामाचा पुनर्विचार होईल का? एकदा निर्णय घेतला की तो बदलत नाहीत अशी शरद पवारांची ख्याती आहे. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी कार्यकारणी सदस्यांची समिती नेमून त्यावर निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली होती. पवारांच्या या भूमिकेमुळे अध्यक्षपदाच्या राजीनामाचा पुनर्विचार होईल का? की पक्षाला नवे अध्यक्ष मिळेल, अशी चर्चा रंगली आहे. मात्र शरद पवार यांनी आपले राजकीय वारसदार निवडल्याचे समजते. येत्या दोन आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली आणि महाराष्ट्र असे दोन अध्यक्ष देण्याचा पवार यांचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने याबाबत विचारले असता त्यांनीही अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष : अंकुश काकडे यांना, याबाबत विचारले असता, पवार साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. दिल्लीच्या राजकारणात त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. अजित पवारांनी पहिल्यापासून देशाच्या राजकारणात मला अजिबात रस नाही. महाराष्ट्रसाठी मी काम करणार, अशी भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे गेल्या पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ नवी दिल्लीत काम करत आहेत. दिल्लीत काम करण्यासाठी कार्याध्यक्ष नेमायचा विषय आला तर खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे किंवा सुप्रिया सुळे यांना संधी मिळू शकते. महाराष्ट्र अजित पवार यांच्याकडे सोपवला जाऊ शकतो. मात्र, सध्या कार्याध्यक्ष नेमण्याचा प्रश्न येत नसल्याचे काकडे म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा म्हणून शरद पवार आहेत. पवार साहेब जो आदेश देतात, तो कार्यकर्ता म्हणून अजित पवार पाळतात. आता अध्यक्षपद जरी दुसरं कोणाला दिले तरी पडद्यामागून काम करायच, अशी भूमिका शरद पवार ठेवत नसल्याचे काकडे यांनी सांगितले.
हेही वाचा - Sharad Pawar Retirement : शरद पवारांच्या निर्णयाने महाविकास आघाडीतसुद्धा मोठा भूकंप?