मुंबई - जे खटल्यात अडकले आहेत, त्यांच्यावर सत्ताधारी दबाव आणून पक्षांतर घडवून आणत आहेत. त्यामुळे पक्षगळती होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. 'कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी' असे म्हणत पवारांनी पक्षांतर करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
तरुणांनी व महिलांनी पुढाकार घ्यावा
निवडणुकीला सामोरे जाताना तरुणांनी व महिलांनी पुढाकार घ्यावा, असा माझा आग्रह असल्याचे पवार म्हणाले. नवीन चेहरे समोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने विचार करणार असल्याचेही ते म्हणाले. आज मुंबईत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते.
राज्याच्या पूरपरिस्थितीवर अनेक मदतीचे हात मिळत आहे. मात्र यात मोठा आकडा आपल्या पक्षाचा आहे, याचा आनंद असल्याचे पवार म्हणाले. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोक विसरत नाहीत. देश चहूबाजूंनी संकटात आहे. आपला पक्ष हा विकासासोबत आहे. अन्यायावर मात करणारा आहे. यासाठी संघटन मजबूत करणं गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.