मुंबई : दरवर्षी २ जून हा आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर डे म्हणून साजरा केला जातो. तसे पाहिले तर जगभरात सेक्स वर्करची सामाजिक स्थिती सारखीच आहे. बऱ्याचदा त्यांना वेश्याव्यवसायाच्या दुनियेत ढकलले जाते. किंवा ते स्वतःच्या इच्छेने सुद्धा येतात. पण त्यांना या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी समाजाच्या सकारात्मक भूमिकेची गरज महत्त्वाची असते. म्हणूनच संपूर्ण जगभरात सेक्स वर्कर्सच्या हक्कांसाठी, जागरुकता अभियानांतर्गत २ जून रोजी आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर डे साजरा केला जातो, हा त्याचा उद्देश आहे.
व्यक्तीच्या जगण्याचा पेशा : सेक्स वर्कर्स संबंधात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आणि यंत्रणांकडे असलेल्या माहितीच्या आधारे भारतात किमान ३० लाख मुली, महिला शरीरविक्रयाच्या बाजारात असून त्या आपल्या वाट्याला आलेले आयुष्य जगत आहेत, असा एक सर्वमान्य अंदाज आहे. ही संख्या अधिकची ही असू शकते. भारतात कुंटनखान्यांपासून ते पंचतारांकित हॉटेलांपर्यंत, खासगी फ्लॅटपासून ते बकाल झालेल्या लॉजपर्यंत, स्पा/हेल्थ क्लबच्या नावाखाली ते अगदी रस्त्यापर्यंत आणि वरवर लक्षातही येणार नाही अशा अवगुंठीत परिसरात शरीरविक्रयाचे बाजार चालू असतात. शरीरविक्रयाचा बाजार हे एक समांतर असे जग आहे. याला फारशी किंमत, पत आणि सहानुभूती नसते. अशा या पत नसलेल्या जगाविषयी नेहमीच बोलले जाते. परंतु त्यांच्या हक्का विषयी त्यांच्या कर्तव्य विषयी जास्त चर्चा होत नाहीत.
स्वइच्छेने हा पेशा करणाऱ्यावर कारवाई करू नये : शरीरविक्रय करणे हा त्या व्यक्तीच्या जगण्याचा पेशा असला तरी त्या व्यक्तीलाही इतरांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. हे लक्षात घेऊन स्वतःच्या इच्छेने हा पेशा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करू नये, ही माफक अपेक्षा असते. परंतु बऱ्याचदा तसे होताना दिसत नसल्याने नाहक शरीरविक्रि करणाऱ्या या व्यक्तींना मोठ्या जाचाला सामोरे जावे लागते. स्वमर्जीने हा पेशा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करू नये, असे मध्यंतरी एका खटल्यात न्यायालयाने म्हटले आहे. तसेच हा आदेश सर्व राज्यांतील, तसेच केंद्रशासित प्रदेशांतील पोलिसांना लागू असल्याचे सांगितल्याने मोठ्या प्रमाणात या निर्णयाचे अनेक स्तरांतून स्वागत झाले. परंतु त्याचे विविध अर्थही लावले गेले.
दलदलीतून बाहेर काढणे गरजेचे : आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर्स 'डे' हा दिवस सेक्स वर्करच्या शोषित कामाच्या परिस्थितीचा सन्मान करण्यासाठी ओळखला जातो. अनेकदा लोक सेक्स वर्कर्सशी योग्यरीतीने वागत नाहीत. त्यामुळे त्यांना नाहक हिंसाचाराचाही सामना करावा लागतो. त्यामुळे हा विशेष दिवस त्यांचा आदर करायला शिकवतो. तसेच अधिकाधिक लोकांनी जागरुक होऊन या घृणास्पद व्यवसायातून बाहेर पडून स्वत:चे वेगळे नवे जग वसवले पाहिजे, त्यासाठी सरकार आणि समाज दोघेही मदतीसाठी पुढे आले पाहिजेत अशी प्रतिक्रिया माँ स्वंयसेवी संस्थेच्या संस्थापीका गीता आयरे यानी दिली आहे. शरीरविक्रयाचा पेशा हा कायदेशीर करा. परवाने देऊन त्यास अधिकृत मंजुरी द्या, तसेच त्याना ठरावीक जागा व्यावसायासाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक दशकांपासून या क्षेत्रासाठी काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था, त्या संबंधित व्यक्ती करीत आहेत.
केवळ पैसे मिळवण्यासाठी, पोट भरण्यासाठी, रोजगार म्हणून या स्त्रिया आपले शरीर विकतात, तर त्यात गैर काय? यातील बऱ्याच महिला-मुली या स्वतःहून या क्षेत्रात आलेल्या आहेत. तर, बऱ्याच जणांची फसवणूक करून त्यांना या क्षेत्रात ओढले गेले आहे. परंतु आज झटपट श्रीमंतीच्या नावाखाली सुद्धा अनेक मुली या व्यवसायाकडे ओढल्या जात आहेत. - गीता आयरे, मां, स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका
सेक्स करण्याची मजबुरी : या व्यवसायात येणाऱ्या महिला, मुली काही कारणास्तव मजबुरीने या क्षेत्राकडे येतात. अशा महिला, मुलींना या दलदलीतून बाहेर काढणे. हे आपले तसेच समाजाचे सुद्धा काम आहे. काम करत असताना बऱ्याच मुलींना, महिलांना पोलिसांनी टाकलेल्या धाड सत्रातून पकडले जाते. परंतु फक्त ५०० रुपये भरून यांना सोडले जाते. आज या महिला दिवसाकाठी हजारो रुपये कमवत असतात. तो त्यांचा अधिकार असला तरी या व्यवसायासाठी शासनाने ठराविक जागा निश्चित करणे फार गरजेचे आहे असे आयरे म्हणाल्या. यासाठी त्यांनी मंत्रालयात सुद्धा पाठपुरावा सुरू केल्याचं गीता आयरे यांनी सांगितले आहे.