मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या ८१ वर्षी निधन झालं. आज सकाळी 7 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचे निधन झाले. याबाबत त्यांचा मुलगा, अभिनेता अजिंक्य देव यांनी वृत्ताला दुजोरा दिला. सात्विक सौंदर्य, उपजत अभिनयगुणांच्या बळावर सीमा देव यांनी पाच दशकांहून अधिक काळ चित्रपटरसिकांना भुरळ घातली. जगाच्या पाठीवर, सुवासिनी, अपराध सारख्या मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी आनंद, संसार, कोशिश, मर्द आदी हिंदी चित्रपटांमधूनसुद्धा त्यांनी स्वतःच्या अभिनयाचा प्रभाव दाखवला. सीमा देव गेली काही वर्ष अल्झायमर आजाराने ग्रस्त होत्या. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक रमेश देव यांचं निधन झालं होतं.
अभिनेत्री सीमा देव यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची कामाची आणि साकारलेल्या भूमिकांची आजही चर्चा होताना दिसते. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. अभिनय यांनी 2020 मध्ये आपल्या आईच्या प्रकृती बाबत माहिती देणारे एक ट्विट केले होते. अभिनव यांनी या ट्विटमध्ये लिहिले होते की, "माझी आई आणि मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास आहे. आम्ही संपूर्ण देव कुटुंब त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत. त्यांच्यावर इतकं प्रेम करणाऱ्या अवघ्या महाराष्ट्रानेही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी, हीच सदिच्छा."
तीन वर्षापासून अल्झायमरच्या आजाराने त्रस्त- याबाबत अधिक माहिती अशी की, सीमा देव या मागच्या तीन वर्षापासून अल्झायमरच्या आजाराने त्रस्त होत्या. अल्झायमरच्या आजारामुळे मागचे काही दिवस त्या कोणालाच ओळखत नव्हत्या. त्यांच्यावर आज दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कर करण्यात येणार आहेत, अशी माहिती सीमा देव यांचे पुत्र आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी दिली आहे. 2022 मध्ये अभिनेते रमेश देव यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज त्यांची पत्नी अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्यांचे मागे पुत्र अजिंक्य आणि अभिनय असा परिवार आहे.
प्रतिभावान अभिनेत्री : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या अभिनेत्री, असं सीमा देव यांचं वर्णन करता येईल. मुंबईतल्या गिरगावमधल्या चाळीत मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सीमा देव या पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ. लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची आवड असली तरी आर्थिक परिस्थिती बेताची होती. घरात आर्थिक हातभार लागावा, म्हणून त्या काही स्टेज शोजमध्ये नृत्य करीत. वयाच्या नवव्या वर्षी एका बॅलेमध्ये नृत्य करत असताना त्यांची प्रतिभा इब्राहिम नाडियादवाला यांनी हेरली. नंतर अभिनेत्री म्हणून नावारुपाला आलेल्या आशा पारेखसुद्धा याच कार्यक्रमात नृत्य करत होत्या. नाडियादवाला यांनी दोघींना चित्रपटात काम करण्याचा प्रस्ताव दिला आणि 'अयोध्यापती' या हिंदी चित्रपटातून दोघींचं बाल कलाकार म्हणून पदार्पण झालं. त्यांना खरी ओळख मिळाली ते दिग्गज निर्माता, दिग्दर्शक राजा परांजपे यांच्या चित्रपटांमधून. राजा परांजपे यांनी अक्षरशः त्यांच्यातली अभिनेत्री घडवली. जगाच्या पाठीवर, हा माझा मार्ग एकला सारख्या चित्रपटांमधून त्यांना चित्रपटरसिकांची दाद मिळाली. दरम्यान, रमेश देव यांच्याशी विवाहबद्ध होऊन नलिनी सराफ या 'सीमा देव' झाल्या होत्या.
एकाहून एक सरस व्यक्तिरेखा : सोज्वळ चेहरा आणि वाबन्नकशी अभिनय हे सीमा देव यांचं वैशिष्ट्य. 'सैनिकहो तुमच्यासाठी' गाण्यात त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव कोणता चित्रपटरसिक विसरु शकेल? 'कशी झोकात चालली कोल्याची पोर' मध्ये चेहऱ्यावर अवखळपणा आणून नृत्य करणाऱ्या सीमा देव याच का, हा प्रश्न पडावा इतका अस्सल अभिनय त्या करीत. 'अपराध' चित्रपटाची खल प्रवृत्तीची व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी जणू परकायाप्रवेशच केला. हिंदीतही अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी व्यक्तिरेखा साकारल्या. अगदी अमिताभ बच्चनच्या आईची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्यांना मिळाली. पण हिंदीत काम करण्यासाठी टुकार भूमिकांचे प्रस्ताव मात्र त्यांनी स्वीकारले नाहीत. सीमा देव यांच्या हिंदी चित्रपटांमधल्या व्यक्तिरेखांचा विषय निघाला की, 'आनंद' चा उल्लेख केल्याशिवाय चर्चा पुढेच सरकू शकत नाही. 'आनंद' मधली राजेश खन्नाची मानलेली बहीण, डॉक्टर पत्नीची व्यक्तिरेखा ज्या ताकदीने साकारली ते पाहून राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि साक्षात ह्रषिकेश मुखर्जीसुद्धा स्तंभित झाले होते.
पडदा आणि पडद्याबाहेर यशस्वी जोडी : चित्रपट कलावंतांचे विवाह जास्त टिकत नाहीत, असा सर्वसामान्यांमध्ये समज आहे. रमेश - सीमा देव हे दाम्पत्य मात्र याला सणसणीत अपवाद ठरलं. 1963 साली झालेला त्यांचा विवाह टिकला आणि 'देवघर' प्रेम, समाधानाने बहरलेलं राहिलं. अजिंक्य आणि अभिनय या त्यांच्या दोन्ही मुलांनी अनुक्रमे अभिनय आणि दिग्दर्शनात स्वतःचं खणखणीत नाणं वाजवून दाखवत आई-वडिलांच्या कलेचा वारसा जपला. सीमा देव यांना काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्या अभिनयसामर्थ्याला न्याय देणाऱ्या भूमिकांचे प्रस्ताव येत होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी एकाही प्रस्तावाचा विचार केला नाही. सीमा देव यांचं 'सुवासिनी' हे आत्मचरित्रही प्रकाशित झालं होतं.
आजाराशी झुंज : कुटुंबवत्सल, पै पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्याची आवड आणि सवय असलेल्या सीमा देव यांना काही वर्षांपूर्वी 'स्मृतिभंश'चं (Alzheimer) निदान झालं. हा आजार जसजसा बळावत गेला तसतशा त्या आप्तांपासूनही काहीशा अलिप्त राहायला लागल्या. पती रमेश देव यांच्या निधनानंतर त्या अधिक कोषात गेल्या. 'अल्झायमर'शी त्यांचा गेल्या काही वर्ष सुरु असलेला संघर्ष आज सकाळी त्यांच्या इहलोकीच्या यात्रेबरोबरच संपला.