मुंबई - मढ आयलंड येथील एका बंगल्यावरील सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी मालवणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण प्रकरणी तिघांना अटक -
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर रोजी मढ आयलंड येथील भाटीया बंगल्यावर दयानंद गौड सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटीवर कार्यरत होते. यावेळी एक अनोळखी महिला आणि तीन अनोळखी व्यक्ती तिथे आले. यावेळी या तिघांनी दयानंद गौड यांना आत जाण्यासाठी विचारणा केली. मात्र आतमध्ये शुटींग सुरू आहे असे दयानंद गौड यांनी त्यांना सांगितले. यावेळी या सर्वांनी जबरदस्तीने आतमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण बंगल्याची पाहणी केली. नंतर पुन्हा गेटवर येऊन त्यांनी दयानंद गौड यांना शिवीगाळ करून धमकावत ते तिथून निघून गेले. यानंतर पुन्हा त्यांनी गेटवर येऊन दयानंदसोबत वाद घालत पैशांची मागणी केली. यावेळी दयानंद याने मदतीसाठी फोन केला असता या महिलेने दयानंदला मारहाण करून त्याचे चित्रीकरण केले. यानंतर दयानंद गौड याने 15 ऑक्टोबर रोजी मालवणी पोलिसांत याची तक्रार दिली असता त्यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी सदरील तिघांना भादंविच्या कलम 452,385,323,504,506,34 अन्वये गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर संबंधित महिलेला नोटीस देऊन पुन्हा हजर राहण्यास सांगण्यात आल्याचे पोलीस म्हणाले.
अटकेतील तिघे हे चित्रपट क्षेत्राशी संबंधित -
या प्रकरणात अटकेतील तिघे हे चित्रपट क्षेत्राशी संबंधित असल्याचे समजते आहे. तर संबंधित महिला राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - ड्रग विक्रेत्यांविरोधात एनसीबीची कारवाई; मुंबईतील वांद्रे, अंधेरी आणि पोवई भागांत छापे