मुंबई - कोरोनाचा सामूहिक प्रसार मुंबईत झाला आहे, याची पाहणी करण्यासाठी पालिकेकडून सेरो सर्व्हे करण्यात येत आहे. या सर्व्हेचा दुसरा टप्पा दहिसर येथून सुरू करण्यात आला. दहिसर प्रमाणेच माटुंगा आणि चेंबूर येथेही सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे.
आयसीएमआरच्या सूचनेनुसार, मुंबईमधील तीन विभागात पालिकेने सेरो सर्वेक्षण केले होते. त्यात झोपडपट्टी विभागात ५७ तर इतर विभागात १६ टक्के अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर एफ-उत्तर (माटुंगा धारावी), एम-पश्चिम (चेंबूर) आणि आर-उत्तर (दहिसर) विभाग कार्यालयांच्या हद्दीत दुसऱ्या टप्प्यात सेरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही भागांतील झोपडपट्ट्यांमध्ये १३ ते २० ऑगस्टदरम्यान, तर वसाहतींमध्ये १७ ते २८ ऑगस्टदरम्यान सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान दहिसरमधील इमारतींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.