मुंबई - वरळी-वांद्रे सी लिंक हा सागरी पूल मुंबईची ओळख बनला आहे. सी लिंकच्या आजूबाजूचे नेमके सौंदर्य सर्वसामान्यांना कळावे, यासाठी एक, दोन नव्हे तर ४० फोटोग्राफर्सनी वेगवेगळ्या बाजूने सी लिंकचे फोटो काढले आहेत. या छायाचित्रांचे प्रदर्शन दादर येथील सावरकर स्मारकात भरले असून रसिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
वरळीच्या सी लिंकला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सी लिंकचे अनोखे सौंदर्य सर्वाना कळावे यासाठी ४० छायाचित्रकार एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या कॅमेरातून टिपलेले १०० पेक्षा जास्त फोटो या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. दिवसा आणि रात्री दिसणारे सी लिंकचे मनमोहक दृश्य असे विविध फोटो येथे मांडण्यात आले आहेत.
या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन आम्ही वांद्रे येथे देखील लावण्याचे नियोजन करत आहोत. 'विषय एक पण फोटो अनेक' या संकल्पनेखाली आम्ही हे प्रदर्शन भरवले आहे, अशी माहिती आयोजक राजू धुरी यांनी दिली.