मुंबई - मंगळवारी झालेल्या सेना-भाजपच्या युतीवरून राज्यभरात टीकांचा धुरळा उडाला आहे. यावर आज बुधवारी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेना-भाजपला १० प्रश्न विचारून कोंडीत पकडले आहे. यापूर्वी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात केलेल्या आरोपांची यादी वाचून त्यांच्या तोंडून आलेल्या प्रश्नांची यादी आहे. त्यावर उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता राज्यातील जनतेला उत्तरे द्यावीत, अशी मागणी सावंत यांनी केली. ही उत्तरे दिली नाही, तर आम्ही हेच प्रश्न राज्यातील मतदारांपुढे घेऊन जाणार असल्याचा इशाराही सावंत यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना मुंबईचा विकास सेनेच्या सत्तेत सडला आहे. येथे माफिया राज दिसले होते ते संपले का? वांद्र्यातील साहेब आणि त्यांचे पीए कोण आहेत, असा सवाल केला होता. मुंबई महापालिकेतील कंत्राटदार भाजपचे आहेत, त्यांना आता युतीचा शिक्का लागणार का? मुख्यमंत्री यांच्यावर संघटित गुन्हे नोंद करणार का? असा सवाल करून सावंत यांनी ठाकरे-फडणवीसांवर जोरदार टीका केली.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील घोटाळ्याला सेना जबाबदार आहे, असे म्हटले होते. त्यासाठी ते विशेष लोकायुक्त नेमण्याची घोषणा केली होती, त्याबद्दल काय झाले? तसेच ठाकरे यांच्या काळ्या पैशाचे काय झाले? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्याचीही मागणी करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्राची शपथ घेतली होती. ते आता कोणती शपथ घेणार? आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ५ कंपन्यांची नावे घेतली होती, त्या ईडीच्या चौकशीचे काय झाले? याचेही उत्तर नागरिकांना द्यावे. तसेच ठाकरे यांनी म्हटले होते, की फडणवीस हे महापौर होते, त्यावेळी त्यांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्याचे आता ठाकरे काय उत्तर देणार? यासह आदी प्रश्न सावंत यांनी उपस्थित करून हेच प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचे सांगितले.