मुंबई - निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची जवाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. फक्त निसर्गाकडून ओरबाडून न घेता निसर्गाचे आपण काही देणे लागतो. या जाणिवेतून घाटकोपरच्या काही तरुणांनी पुढाकार घेत निसर्ग संवर्धनाची मोहीमच हाती घेतली आहे. घाटकोपर डोंगराला हरित करण्यासाठी घाटकोपर डोंगर ग्रुप मधील प्रत्येक जण एक लिटर पाणी घेऊन या डोंगरावर येतो आणि या झाडांना पाणी देत त्यांना जागवण्याचा प्रयत्न करत असतो.
मुंबईत असलेल्या घाटकोपरला या ठिकाणी असलेल्या घाट माथ्यांमुळे 'घाटकोपर' हे नाव पडले. या ठिकाणी पूर्वी डोंगरावर वनराई होती, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती होत्या, विविध रान भाज्या मिळायच्या. मात्र, या डोंगरावर मानवाने अतिक्रमण केले आणि डोंगरावर मानवी वसती निर्माण झाली. मात्र, तरीही काही डोंगर अजून शिल्लक आहेत. मात्र, ते बोडके झाले आहेत. त्याठिकाणी असलेली निसर्ग संपदा नष्ट करण्यात आली आहे. हीच समस्या लक्षात आल्यावर घाटकोपरमधील काही नागरिक पुढे सरसावले आणि त्यांनी डोंगरावर असलेली झाडे जागवण्याचा ध्यास हाती घेतला.
नागरिकांनी एकत्र येत डोंगरावर अनेक झाडे लावली आणि त्या झांडाचे संवर्धन आणि संरक्षण करायचे निश्चित केले. याच घाटकोपर डोंगर ग्रुप मधील प्रत्येक जण एक लिटर पाणी घेऊन या डोंगरावर येतो आणि या झाडांना पाणी देत त्यांना जगवण्याचा प्रयत्न करत असतो. पांडे नावाच्या व्यक्तीने सुरू केलेली ही कल्पना वाढत गेली. या उपक्रमाशी अनेक जण जोडले गेले. एक लिटर ते ५ लिटरच्या कॅनमध्ये पाणी घेऊन अनेक युवक आणि ज्येष्ठ नागरिक या उंच डोंगरावर येतात आणि झाडांना पाणी घालतात.
येथील स्थानिक नागरिक सयाजी बोरकर यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिले. ते म्हणाले की, निसर्गाचे जतन करण्यासाठी आम्ही रोज भल्या पहाटे हातात पाण्याचे डब्बे, बाटल्या आणि कॅन घेऊन गिरिभ्रमण करतो. या मोहिमेत तरुणांसोबतच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग सुद्धा सहभागी झाली आहेत. समाज माध्यमातून आलेल्या क्लिपचा वापर करत त्यांनी ठिंबक सिंचन योजना राबवली. बाटलीत छिद्र पाडत त्यातून ठिंबक सिंचन सुरू केले आहे. एक एक लिटर पाण्याच्या माध्यमातून ५०० लिटर पाणी रोज या डोंगरावर येत आहे. ही निसर्गसंपदा पुन्हा एकदा सज्ज होत आहे. म्हणूनच एक एक थेंबाने का होईना सकारत्मकतेने निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन होत आहे. असेही सयाजी बोरकर यांनी सांगितले.