मुंबई - शिवसनेचे नेते संजय राऊत यांची दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर प्रथमच त्यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित केले. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही जण फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. असे करणाऱ्याचे लवकरच नाव समोर येईल, असेही राऊत यांनी सांगितले. आजच्या पत्रकार परिषदेतील राऊत यांचा सुर नेहमीपेक्षा नरमलेला दिसून आला.
महाराष्ट्र राजकारणाचा व्यापार करत नाही. बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरेंची अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. आमच्यासाठी ती खोली मंदिराएवढी पवित्र आहे. त्यामुळे त्या खोलीत झालेली बंद दाराआडची चर्चाही आमच्यासाठी तेवढीच पवित्र आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, की शिवसेना खोटं बोलत नाही. बंद दाराआड झालेली चर्चा मोदींपर्यंत पोहोचवली गेली नाही, त्यामुळे ते जाहीर सभांमधून देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत गेले. निवडणूक प्रचारात त्यांना खोटे पाडणे हे आम्हाला योग्य वाटले नाही. परंतू मोदी आणि बाळासाहेबांच्या नात्यात कोणीतरी मिठाचा खडा टाकला आहे. मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधात दुरावा निर्माण व्हावा याचे प्रयत्न झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी महाराष्ट्रातील राजकारणावर प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यात त्यांनी बंद दाराआड झालेल्या चर्चेला सार्वजनिक करता येणार नसल्याचे सांगितले. त्यावर राऊत यांनी आमच्यासाठी ती बंद खोली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचे अस्तित्व लाभलेली खोली पवित्र मंदिर असल्याचे म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे, असा उल्लेख करुन संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्र राजकारणाचा व्यापार करत नाही, असा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता शाहांना लगावला. त्यासोबतच शिवसेनेला धमकावण्याचे काम कोणी करु नये असा इशाराही भाजपला दिला आहे.
पत्रकार परिषदेतील मुद्दे -
- मोदी सर्व सभांमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होतील असं म्हणत होते, पण उद्धव ठाकरेही सांगत होते, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, तेव्हा तुम्ही का रोखलं नाही? लोकसभा निवडणुकापूर्वी का बोलला नाहीत? आता बोलत आहेत, ही नैतिकता नाही
- आम्ही पंतप्रधान पदाच्या पदाची प्रतिष्ठा राखतो, उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बंद खोलीत काय झालं हे मोदींना सांगितले गेले नाही
- बंद खोलीतील चर्चा उघड होऊ नये, मात्र ही चर्चा सामान्य नव्हती, स्वाभिमानाची होती, ती चर्चा महाराष्ट्राच्या भवितव्याची होती, राजकारणात सत्याचा बोलबाला होत नाही, मात्र शिवसेनेने राजकारणाचा बाजार मांडला नाही
- महाराष्ट्र हा शाहू-फुले-आंबेडकरांचा, शिवछत्रपतींचा आहे, या महाराष्ट्रात कधी राजकारणाचं व्यापारीकरण झालं नाही, बंद खोलीतील चर्चा पंतप्रधानांपर्यंत पोहोचली असती, तर ही बाब इथपर्यंत पोहोचलीच नसती.
- ज्या खोलीत चर्चा झाली, ती खोली सामान्य नव्हती, ती बाळासाहेबांची खोली होती, त्याच खोलीतून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा दिला, त्याच खोलीत उद्धव ठाकरे आणि अमित शाहांमध्ये चर्चा झाली. ती केवळ खोली नाही तर मंदिर आहे, त्या मंदिरात हा सर्व चर्चा झाल्या. मंदिरात खोटं बोलू नका
- शब्दाला किंमत आहे. राजकारण हा आमच्यासाठी व्यापार नाही. त्यामुळे बंद दाराआडच्या गोष्टी तशाच का ठेवल्या नाही. बंद खोली ही आमच्यासाठी मंदिर आहे. बाळासाहेब तिथे वावरले आहेत. या मंदिरातल्या चर्चेला तुम्ही नाकारात असाल तर तुम्हाला शुभेच्छा आहेत.
- आम्ही अमित शाह, नरेंद्र मोदी यांचा कायम आदर केला आहे आणि करत राहू.
- काही लोक नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे नाव लवकर समोर येईल.
- आम्हाला कुणीही घाबरवू शकत नाही. असं कुणी करेल तर त्यांनीही भिऊन राहावे.