मुंबई - मंदिरे बंद ठेवणे हे काही कोणी आनंदाने करत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार टप्याटप्याने अनेक गोष्टी सुरू करत आहे. लवकरच मंदिराचा आणि रेल्वेचा विषय सोडवला जाईल. विरोधी पक्षाने सुद्धा राज्याच्या हितासाठी संयम बाळगला तर राज्याच्या जनतेवर उपकार होतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपकडून सुरू असलेल्या घंटानाद आंदोलनावर दिली.
पंढरपूरला प्रकाश आंबेडकर यांनी जी गर्दी जमवली आहे, हे चित्र सकारात्मक नाही, असे राऊत यांनी म्हटले. वारकरी संप्रदायाशी आमची चर्चा झाली आहे. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंग महत्वाचे आहे, त्याचा मंदिराबाहेर फज्जा उडालेला दिसत आहे, त्यातून संक्रमण वाढू शकते. प्रकाश आंबेडकर संयमी नेते आहेत, कायद्याचे जाणकार आहेत. त्यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तीकडून आरोग्य विषयक आणीबाणी असताना कायदेभंगाची भाषा करणे हे लोकांना हुसकावण्यासारखे आहे, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा-आठ दिवसात खुली होणार राज्यातील मंदिरे; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर वंचितचे आंदोलन मागे
प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी प्रयत्न केला असेल. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशी त्यांनी चर्चा करावी. लोकांना वेठीस धरुन आंदोलन करु नये, तणाव निर्माण करु नये. भाजपच्या आंदोलनात किती फिजिकल डिस्टंन्सिंग पाळले ते आपण पाहिले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्यांनी राज्यात थांबू नये
मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला जातोय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपले चंबू गबाळ आवरावे त्यांच्या राज्यात जावे. हा काय तमाशा चाललाय. राज्याच्या गृहमंत्री यांनी यावर सडेतोड उत्तर दिले पाहिजे मग ते कोणीही असेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडचे मीठ खाताय ही बेईमानी आहे, अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर ही मोठी बेईमानी आहे, अशी टीका राऊत यांनी विरोधकांवर केली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हा विषय गांभीर्याने घेत अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा मुंबई पोलीस राज्याचा प्रशासन त्याबाबत अविश्वास दाखवणाऱ्या वक्तव्यांना पाठिंबा देऊ नये. देशाचे पंतप्रधान मन की बातमधून वेगवेगळ्या विषयवर बोलले. काल खेळण्याबाबत विषय घेतला, अर्थकारणाला चालना देणारी बात त्यांनी केली आहे. परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. आता राज्य सरकारने पुढे काय करायचे हे ठरवावे, असे राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, पुढील आठ दिवसात राज्यातील मंदिरे खुली करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले आहे.