मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला दुसरा उमेदवारही रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. काँग्रेसने दुसरा उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. राज्याची स्थिती गंभीर असताना कोणी राजकारण करू नये, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भूमिका आहे. पण काँग्रेस आपला दुसरा उमेदवार मागे घेण्यासाठी तयार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणे धूसर झाले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय बैठकांचे फड रंगात आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली आहे. तर पवार यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांशीही संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. घटनात्मक पेच टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळातीळ विधान परिषदेचे सदस्यत्व मिळवून देण्यासाठी, कोरोनाचा प्रादुर्भाव असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले. मात्र, आता सहाव्या जागेवरून आघाडीत बिघाडी निर्माण होत आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही संतप्त झाले असल्याचे शिवसेनेच्या गोटात चर्चीले जात आहे.
याबाबत राऊत यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, राज्यात गंभीर परिस्थिती आहे. मुख्यमंत्री स्वतः या निवडणुकीला सामोरे जात आहेत. राज्याला स्थिर सरकार हवे आहे. या स्तिथीचे कोणी राजकारण करून त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करू नये, अशीच सेनेची भूमिका आहे. परिषदेच्या 9 जागांसाठी 9 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार होती. त्यातच काँग्रेसने सहावा उमेदवार दिल्याने आता निवडणूक होणार असून घोडेबाजार ही भरणार, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, काँग्रेसने अतिरिक्त उमेदवार मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी काय प्रयत्न करायचे किंवा उमेदवारी मागे घ्यायची का? याबाबत काँग्रेस नेते, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि डॉ. नितीन राऊत यांच्यात बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर काँग्रेसचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांना कळवण्यात येईल असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.