मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांची आज सांताक्रूझ येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली. या भेटीनंतर राऊत यांनी एक सूचक ट्विट केले असल्याने या भेटीवर राज्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. साधारण दोघांमध्ये 2 तासापेक्षा अधिक काळ बैठक झाल्याचे समोर आले आहे.
पुन्हा राजकीय वादळ निर्माण होईल ?
राज्यात महाविकास आघाडी स्थापन करताना सुरूवातीला राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अशाच प्रकारच्या गुप्त बैठका घेऊन सरकार स्थापन करण्यासाठीची भूमिका बजावली होती. त्यामुळे आज फडणवीसांसोबत झालेल्या राऊत यांच्या गुप्त भेटीने राज्यात पुन्हा राजकीय वादळ निर्माण होईल काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस आणि राऊत हे एकाच वेळी सांताक्रूझ येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये दुपारी दीड वाजता पोचले होते. तेव्हापासून ते साडेतीन वाजेपर्यंत या हॉटेलमध्ये एकत्र होते. त्यामध्ये बरेच मोठे राजकीय खलबते झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान यासंदर्भात, आपली कुठलीही गुप्त भेट झाली नसल्याचा दावा राऊत यांनी केला असला तरी या संदर्भात अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.
महाविकास आघाडीत कुरघोड्या
मागील काही दिवसांपूर्वी राऊत यांनी सामनासाठी आपण फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याचे सांगितले होते, मात्र त्या पार्श्वभूमीवर ही भेट या मुलाखतीची नसावी असा अंदाज लावला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून एकमेकांमध्ये कुरघोड्या सुरू असून त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रामध्ये नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या कृषी धोरणाच्या संदर्भात शिवसेनेने अद्यापही ताठर भूमिका घेतली नाही. या सोबतच कामगार विधेयकासंदर्भातील सेनेने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे या बैठकीत या विषयावर शिवसेनेने आपली भूमिका सौम्य ठेवावी, यासंदर्भात चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये मागील विधानसभा निवडणुकीमध्ये नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण झाला असून पुन्हा ते लवकर एकत्र येणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.