मुंबई - एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची डीजीएआरएम मुंबई पदावरून चेन्नईला बदली झाली आहे. चेन्नई येथे DGTS म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक या पदी बदली करण्यात आहे.
केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी (दि. 30 मे) काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये समीर वानखेडे यांची चेन्नईच्या डीजीटीएसपदी बदली करण्यात आली आहे. हे पद अडगळीचे किंवा साईड पोस्टिंग असल्याचे समजते. समीर वानखेडे यांचा मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना आर्यन खान प्रकरणामुळे कार्यकाळ वाढून देण्यात आला नव्हता. त्यावेळी त्यांची बदली मुंबईतील डीजीएआरएम पदावर बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता चेन्नई बदली करण्यात आली आहे.
समीर वानखेडे यांच्यावर कार्डीलिया क्रुझ, आर्यन खान प्रकरणी चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या चुकीच्या तपासाबद्दल त्यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. यानंतर एनसीबी मुख्यालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली. या तपासाची जबाबादारी एनसीबीचे उपसंचालक जनरल संजय सिंह यांना सोपवण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, या एसआयटीने आपल्या तपासादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर लक्ष दिले. ज्यात अटकेच्यावेळी आर्यन खानकडून अमली पदार्थ जप्त झाला होता का, तो ड्रग्ज सिंडिकेटचा सदस्य होता का, अटकेच्या वेळी त्याला एनडीपीएस कायदा लागू होता की नाही, अटकेच्या वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नियम पाळले गेले होते की नाही, या मुद्द्यांचा समावेश होता.