मुंबई - महानगरपालिकेच्या रुग्णालयात कोरोनासाठी काम करणाऱ्या बंधपत्रित निवासी डॉक्टर आणि सीपीएस ( कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन, मुंबई) निवासी डॉक्टरांना अखेर मुंबई महानगरपालिकेने मोठा दिलासा दिला आहे. या डॉक्टरांना कोरोनाच्या कामासाठी पगारवाढ देण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. याबद्दल अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती दिली आहे.
निवासी डॉक्टर आणि इंटर्न डॉक्टरांसह बंधपत्रित वरिष्ठ निवासी डॉक्टर तसेच सीपीएस डॉक्टरही पालिका रुग्णालयात कोरोनासाठी काम करत आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांना 10 हजार रुपये पगारवाढ देण्यात आली होती. इंटर्नला 39 अतिरिक्त वाढ मिळाली. मात्र, त्याचवेळी सीपीएस निवासी डॉक्टर केवळ 14800 रुपये पगारावर काम करत आहेत, तर बंधपत्रित निवासी डॉक्टरांना 54 ते 78 हजार दरम्यान पगार आहे. त्यामुळे कायमस्वरुपी पगारवाढीची मागणी बंधपत्रित आणि सीपीएस डॉक्टरांनी केली होती. सीपीएस डॉक्टरांना पगारवाढ देण्याचे पालिकेने जाहीर केले होते. पण प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने डॉक्टर संभ्रमावस्थेत होते. ते सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते. त्याला अखेर यश आले आहे.
सीपीएस डॉक्टरांना आता 14800 वरून 50 हजार पगारवाढ करण्यात आली आहे. तर, बंधपत्रित डॉक्टरांना 20 ते 25 हजार अशी पगारवाढ मिळणार आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय झाला असून पुढच्या महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असेही काकाणी यांनी सांगितले आहे. दरम्यान, निवासी डॉक्टरांनी या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनासाठी पगार वाढ दिली याचा आनंद आहे. पण, आमची मागणी कायमस्वरुपी पगारवाढीची आहे. त्यामुळे याचाही विचार पालिकेने करावा, असे या डॉक्टरांनी म्हटले आहे.