मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांना नेहमीच मदत करणाऱ्या पेण येथील कल्पेश शरद ठाकूर यांच्या साई सहारा प्रतिष्ठानच्यावतीने महाड व पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त व दरडग्रस्तांना मदतीचा हात देऊन सामाजिक दायित्व जपले आहे. मागील आठवड्यात 22 व 23 जुलैला रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाडमधील तळीये व पोलादपूर येथल्या केवनाळे, साखर सुतारवाडी, आंबेमाची, नानेगाव येथे दरड कोसळून शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाड शहरात दोन दिवस पुराचे पाणी साचून राहिल्याने अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचे 500 कीट वाटप -
महाड व पोलादपूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रायगडसह महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीला नेहमीच धावणाऱ्या पेण येथील कल्पेश ठाकूर हे देखील महाडकरांच्या मदतीला पुढे सरसावले आहेत. महाड व पोलादपूर येथील आपत्तीनंतर येथील बहुतांश गावात वीजपुरवठा खंडीत झालेला असल्याचे लक्षात घेऊन सौरऊर्जावर चालणारे दिवे, ब्लँकेट, पाण्याचे बॉक्स, खाद्य पदार्थ या बरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे 500 कीट महाड शहर, पोलादपूर येथील दरडग्रस्त केवनाळे, साखर सुतारवाडी, आंबेमाची, नानेगाव, चरई, चिरखिंड वाडी, सुतार पेडा, राकी आदिवासी वाडी आदी नागरिकांना वाटप केले.
पत्रकारांसह पोलिसांनाही मदत -
या नैसर्गिक आपत्तीचा फटका सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महाड व पोलादपूर येथील पत्रकारांनादेखील बसला आहे. हे लक्षात घेऊन महाड व पोलादपूर येथील पत्रकारांनादेखील मदतीचा हात त्यांनी पुढे केला. या आपत्तीत पोलीस स्टेशनदेखील सुटले नाहीत. महाड येथील तालुका पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन हे देखील दोन दिवस पूर्णपणे पाण्याखाली होते. या दोन्ही पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी देखील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पोलादपूर येथील पोलिसांची वसाहत पाण्याखाली जाऊन या वसाहतीमधील कुटुंबाचे संसार उद्धवस्त झाले. त्या कर्मचाऱ्यांनादेखील कल्पेश ठाकूर यांच्या साई सहारा प्रतिष्ठानने मदतीचा हात देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics : सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले; उपांत्य फेरीत पी. व्ही. सिंधूचा पराभव