मुंबई : Sachin Tendulkar Online Gaming : महाराष्ट्र हे शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळं प्रगतिशील राज्य म्हणून देशात, जगात ओळखलं जातं. 'ऑनलाईन गॅम्बलिंग' खेळू नये, अशा बद्दलची भूमिका महाराष्ट्र शासन मांडत असतं. मात्र, भारतरत्न सचिन तेंडुलकर ज्याला क्रिकेटचा देव म्हणून देशात मान आहे, त्याच्याकडून ऑनलाइन रमीची जाहिरात खुलेआम केली जात आहे. तसंच हिंदी चित्रपट सृष्टीमधील सुपरस्टार अजय देवगण त्याच्याशिवाय अनेक सेलिब्रिटी या ऑनलाइन रमीची जाहिरात करत आहेत. याच्यावर बंदी आणली पाहिजे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दाखल केलेल्या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
खेळावर बंदी तर जाहिरात कशी? : याचिकेमध्ये मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे की, 'महाराष्ट्र प्रिव्हेंटेशन ऑफ गॅम्बलिंग ऍक्ट' नुसार अशी जाहिरात करण्याबाबत कुठेही उल्लेख नाही. खेळायलाच बंदी आहे, तर खेळाची जाहिरात कशी काय होऊ शकते? ही देखील बाब गंभीर आहे. म्हणून न्यायालयानं याची चौकशी करायला पाहिजे आणि यावर बंदी आणली पाहिजे. यासंदर्भात याचिकाकर्त्यांचे वकील विनोद सांगवीकर यांनी याचिकेमध्ये नमूद केलेले आहे की, 1887 चा 'प्रिव्हेंटेशन ऑफ गॅम्बलिंग Act' आहे. जेव्हा कायदा तयार करण्यात आला, त्यावेळी इंटरनेट वगैरे काही नव्हतं. आता इंटरनेट आलं आहे. या संदर्भात ऑनलाइन रमी खेळली पाहिजे असं कुठेही त्यामध्ये नाही. मग जाहिरात कशी काय करता येऊ शकते? कायद्यानुसार हा प्रश्न व्यापक देश आणि राज्यातील जनतेच्या हितासंदर्भातील आहे. म्हणून ही जनहित याचिका दाखल केली आहे.
सचिन तेंडुलकरकडून अशी अपेक्षा नाही : सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव आहे. त्याच्याकडनं अशी अपेक्षा नाही. शिवाय इतर देखील सेलिब्रेटी आणि क्रिकेटपटू आहेत, त्यांनी कायद्याचं उल्लंघन करून अशी जाहिरात करू नये. म्हणून न्यायालयानं हस्तक्षेप करावा, अशी विनंती आम्ही याचिकेत केली असल्याचं याचिकाकर्ते राजेंद्र पाटील यांनी सांगितलंय.
कोण-कोण करतं जाहिरात : क्रिकेटपटू सुरेश रैना, भारतरत्न सचिन तेंडुलकर, चित्रपट सुपरस्टार अजय देवगन, मराठी चित्रपट सुपरस्टार अंकुश चौधरी, हिंदी चित्रपटातील अभिनेता अन्नू कपूर, ऋतिक रोशन, मनोज बाजपेयी, शाहरुख खान, मुनमुन दत्ता, स्वप्निल जोशी या सर्वांकडूनच ऑनलाईन रमीची जाहिरात करण्यात येत आहे.
हेही वाचा: