मुंबई - अंबानी यांच्या घराबाहरील स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासात एनआयने तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. त्यानंतर तपासादरम्यान ‘एनआयए’च्या पथकाने मंगळवारी रात्री एक मर्सिडीज जप्त केली. मात्र, मनसुख हिरेन यांनी १७ फेब्रुवारीला वापरेलेल्या त्याच मर्सिडीज कारसोबत(एमएच १८-बी आर-९०९५) ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके यांचा फोटो समोर आला आहे. या संदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांकडून खुलासा मागितला आहे.
ठाणे जिल्हा ग्रामीणचे भाजप युवा मोर्चाचे सचिव-
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी NIA ने ताब्यात घेतलेल्या मर्सिडीज बेंझसोबत ठाणे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे फोटो काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत, भाजपाला याबाबतही स्पष्टीकरण देणार का? असा सवाल केला आहे. देवेने हेमंत शेळके असे त्या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शेळके हे ठाणे जिल्हा ग्रामीणचे भाजप युवा मोर्चाचे सचिव असल्याचेही एक नियुक्ती पत्रही सावंत यांनी ट्विट केले आहे. सचिन वाझे या गाडीचा वापर करीत होते, अशी माहिती एनआयएचे विशेष महानिरीक्षक अनिल शुक्ला यांनी दिली होती.
फडणवीसांनी आरोपींना पाठीशी घालू नये-
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या 15 मार्चच्या निर्णयाने आरोपीची खाजगी माहिती ३ ऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल, असा एक निकाल दिला आहे. तोच धागा पकडून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात फडणवीस यांनी मिळलेला सीडीआरवरून फडणवीस यांना विनंती केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना मिळालेल्या सीडीआरचा स्त्रोत न सांगून आणि तो स्वतःकडे ठेवून फडणवीस २ आरोपींना पाठीशी घालत आहेत, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. सीडीआर मिळवणे हा गुन्हा आहे, नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे फडणवीस यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांचेकडे असलेले पुरावे तपास यंत्रणांना द्यावेत. जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे ही काँग्रेसचीही भूमिका आहे.
कायदा हा सर्वांसाठी समान आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने CDR रॅकेट उघडकीस आणून त्यातील दोषींवर कारवाई केली होती. सामान्य लोकांना एक न्याय आणि फडणवीसांना दुसरा न्याय हे योग्य नाही. ते मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेले आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांच्याकडील माहिती तपास यंत्रणांना देऊन सहकार्य करावी अशी अपेक्षा आहे