मुंबई - दिल्लीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शहीद भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा ठेऊन खोडसाळपणा केला होता. त्याला एनएसयुआयने ज्याप्रकारे विरोध केला आणि सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासले ते चुकीचेच आहे, असा निर्वाळा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
सावंत म्हणाले, की शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सावरकर यांचे विचार आणि आचार हे वेगवेगळे आहेत. सावरकर यांनी इंग्रजाकडे ९ वेळा माफी मागितली होती. इतकेच नव्हे तर आझाद हिंद सेनेलाही विरोध केला होता. हे त्यावेळी देशाने पाहिले होते. त्यामुळे अशा विचारांच्या व्यक्तीचा पुतळा शहीद भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांच्या बाजूला ठेवणे हे चुकीचे आहे. त्यामुळे त्याचे समर्थन करता येत नसल्याचे सावंत म्हणाले.
सावरकर यांनी एकीकडे इंग्रजांची माफी मागितली असताना दुसरीकडे शहीद भगतसिंग यांनी आपल्याला फाशी न देता गोळी झाडून आपल्याला शिक्षा द्यावी, अशी मागणी एका पिटीशनच्या माध्यमातून केली होती. परंतु ते इंग्रजापुढे झुकले नव्हते. तर दुसरीकडे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनीही प्रचंड मोठा त्याग देशासाठी केला होता. अशा दोन महान व्यक्तींच्या बाजूला सावरकरांचा पुतळा ठेवू नये. हे चुकीचे असल्याचे सावंत म्हणाले.