मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्तेत आणण्यात पवारांचा महत्वाचा वाटा आहे. त्याच महाविकास आघाडीचा एक घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने देखील शरद पवारांना पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची स्तुती केली आहे.
काय म्हटले आहे सामनात-
शरद पवार म्हणजे हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेले ८० वर्षाचे व्यक्तिमत्व आहे. मात्र, तरीही त्यांचे वय वाढले नाही असा उत्साह त्यांच्यामध्ये आजही दिसून येतो. पवार हे देशातील सर्वात अनुभवी नेते आणि यंशवतराव चव्हाण यांचे राजकीय आणि वैचारिक वारसादार आहेत. आज त्यांचा ८० वाढदिवस आहे. मात्र, पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, अशा संभ्रमात देश पडला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
अनेकदा तरुण राजकारणी आराम करत असतात तेव्हा शरद पवार महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात, त्यांच्या आजच्या ८० व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला देखील ते देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतीची भेट घेतात, नैसर्गिक आपत्ती काळात शेतकऱ्यांची दुखे समजून घेण्यात पवार आघाडीवर असतात, त्यामुळे पवारांना आज ते ८० वर्षाचे झालेत असे कोण म्हणेल का? अशी स्तुती सामनातून केली आहे.
पवारांना आशीर्वाद देणारे हात नाहीत-
शरद पवारांच्या आजच्या वाढदिवसावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असायला हवे होते. ते असते तर आज त्यांनी वडीलकीच्या नात्याने पवारांना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे हात नाहीत आणि पवार झुकून नमस्कार करतील असे पाय दिसत नाहीत. कारण शरद पवार स्वत:च सह्याद्री बनून देशाचे नेते झाले आहेत. ५० वर्षापेक्षा अधिककाळ संसदीय राजकारणात आहेत. ते सर्वच निवडणुकात अजिंक्य असल्याचे सांगत पवारांच्या तोडीचा नेता देशाच्या राजकारणात नसल्याचे शिवसेनेने अधोरेखीत केले आहे.
यशवंतराव चव्हाण आणि पवार-
राज्यात यशवंतराव चव्हाण याच्या उंचीचा नेता गेल्या ७० वर्षात निर्माण झाला नाही, लोक आजही त्यांचे स्मरण करतात, त्याच चव्हाणांनी पवारांना घडवले आहे. आता पवारांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यापाहून यशवंतराव चव्हाणांच्या तोलामोलाची व्यक्ती म्हणून पवारांकडे पाहायला हवे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्याकडे धाडस सोडले तर सर्व गुण होते. मात्र, पवारांच्या राजकीय प्रवासात धाडसाची मात्रा जास्तच असल्याचेही सामनातून अधोरेखीत केले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणे शरद पवारांनाही माणसे जोडण्याचे म्हणजेच बेरजेचे राजकारण करण्याच छंद असल्याचेही म्हटले आहे.
पवारांनी चातुर्याने एका मताने पाडले वाजपेयी सरकार-
शरद पवार लोकसभेत विरोधीपक्षनेते होते. पवारांच्या चातुर्यांनेच वाजपेयींचे सरकार एक मताने पडले याचा उल्लेख करताना सामनातून तत्कालीन काँग्रेसच्या राजकीय हेतूवर टीका ही करण्यात आली आहे. पवारांना सरकार पाडल्यानंतर त्यांना विश्वासात न घेता सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीकडे सरकार स्थापनेचा दावा करायला गेल्याचे म्हटले आहे.
पवारांची दिल्लीच्या नेत्यांना नेहमीच भीती वाटते-
शरद पवार हे राज्याच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात पूर्ण तयारीने उतरले होते. राजीव गांधींच्या हत्येनंतर जर संसदीय काँग्रेस पक्षात मतदान झाले असते तर नेतेपदी शरद पवार बहुमताने निवडून आले असते, मात्र उत्तरेच्या लॉबीने नरसिंहरावांना पुढे करून पवारांचा मार्ग अडवला असल्याची टीकाही त्यावेळच्या राजकारण्यांवर केली आहे. तसचे दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती वाटत आली. पवारांची हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब उत्तरेच्या जी हुजुरी नेत्यांना अडचणीचा ठरला असता, त्यामुळेच पवार हे बेभरवशाचे नेते असल्याची हाकाटी कायम सुरू ठेवली गेल्याचा आरोप ही सामानातून कऱण्यात आला आहे.