मुंबई - राज्या-राज्यांचे काँग्रेसचे वतनदार स्वतः पुरते पाहतात. पक्ष त्यांच्या खिजगणतीतही नाही. पक्षात जमले नाही की भाजपमध्ये पळायचे हीच सध्या सक्रियता झाली आहे. हा नवा राजकीय कोरोना व्हायरस आहे, अशी उपमा पक्ष सोडून भाजपमध्ये पलायन करणाऱ्या पुढाऱ्यांना शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून दिली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यावर काय करणार? म्हणूनच पत्र पुढाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेस व्यापक पाठिंबा मिळू शकला नाही. काँग्रेस वर्किंग कमिटीतील वादळ व आधीचे पत्रप्रयोग म्हणजे आडगावच्या चार हौशा गवशांनी बसविलेला 'एकच प्याला' या नाटकाचा रेंगाळलेला प्रयोग होता. नाटक नीट बसले नाही व पात्रांच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांनी नाटक जागेवरच बंद पाडले, पण नवा प्रयोग हा नव्या संचात राहुल गांधींनी लवकरच राजकीय मंचावर आणला नाही तर लोक नाटकाचे पडदे आणि प्रॉपर्टी चोरून नेतील, अशा शब्दांत एकूणच काँग्रेस मधील अंतर्गत कलहावर काँग्रेस नेत्यांना विचार करायला लावणारे भाष्य करण्यात आले.
काँग्रेस वर्किंग कमिटीत पडलेले नाटक
देश संकटाच्या खाईत गटांगळ्या खात असताना काही लोकांना राजकारण कसे सुचते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सीबीआयचे पथक मुंबईत येऊन विराजमान झाल्यापासून अनेकांचे आत्माराम थंडावले आहेत. त्या संदर्भातील बातम्याही पहिल्या पानावरुन आतल्या पानावर गेल्या आहेत. वृत्तवाहिन्याही थंडावल्या आहेत. त्यामुळे मीडिया व राजकारण्यांचा त्यातला रस संपला. आता काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहावर बातम्यांचा बाजार गरम करण्याचा काम सुरू झाले आहे, असा टोला शिवसेनेने सामनातून विरोधकांना लगावला आहे.
काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी करणारे एक पत्र जुन्या काँग्रेस पुढाऱ्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले, त्या सर्व नेत्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. ज्यांनी पत्र लिहिले त्यातील एकही नेता हा देश, राज्य पातळीवर देखील लोकांचा नेता नाही. या नेत्यांनी काँग्रेस, गांधी नेहरू परिवाराच्या बळावर मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत अनेक महत्त्वाच्या गाद्या मळल्या आहेत, अशी टीका कॉंग्रेस अध्यक्षपदाबाबत मागणी करणाऱ्या नेत्यांवर करण्यात आली आहे.
70 वर्षांच्या सोनिया गांधी यांना पक्षांतर्गत संगीत खुर्ची, खो खो, हुतूतू, आट्यापाट्यांचे सामने भरून सक्रियता दाखवावी, असे या मंडळींना वाटते का? राहुल गांधी हे सक्रिय होते, त्यांनी एकाकीपणे मोदी शहांना अंगावर घेतले. राहुल गांधी यांचे खच्चीकरण मोदी शहांच्या भाजपने केले नसेल तेवढे पक्षांतर्गत जुन्या कोंडाल्याने केले आहे, अशी राहुल गांधी यांची बाजू देखील सामनातून मांडली आहे.
ज्योतिरादित्या शिंदे यांना पक्षाने काय कमी दिले होते का? असा सवालही करण्यात आला आहे. मात्र, दिग्विजयसिंह, कमलनाथ यासारखे जुने नेते केवळ पक्षात स्वत:चे स्थान जपण्यासाठी सक्रियता दाखवतात. प्रसंगी भाजपशी हात मिळवणी करता. मात्र, पक्षासाठी मोठी झेप घ्यावी असे त्यांना वाटत नसल्याची टीकाही सामनातून केली आहे. तसेच राज्यातील पृथ्वीराज चव्हाणांना साताऱ्यातून निवडून येण्यासाठी शरद पवारांची मदत घ्यावी लागत असल्याचा खोचक टोलाही लगावण्यात आला आहे.